राज्यातील काही ‘हॉटस्पॉट’मधील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता


मुंबई – देशभरासह राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनचा सध्या तिसरा टप्पा सुरु असून तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी संपण्यासाठी केवळ 10 दिवस उरले आहेत. कोरोनाचा फैलाव लॉकडाऊनमुळे रोखण्यात यश आले असले तरी राज्यातील काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी राज्यासाठी डोके दुखी ठरत असल्यामुळे राज्यातील कोरोना हॉटस्पॉटमधील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 56 हजारावर गेला असून याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रात एकूण 17 हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबई, ठाणे, पुणे शहरात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी लॉकडाऊनचा कालावधी वाढू शकतो, अशी माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना लॉकडाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, 10 दिवस लॉकडाऊनचा कालावधी संपण्यासाठी बाकी असल्यामुळे लॉकडाऊन वाढेल याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, अद्याप याबद्दल आताच काही ठोस सांगता येणार नाही.

दरम्यान काल सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध सूचना केल्या. तसेच उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाले की, सध्याच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात आपण यशस्वी झालो आहोत. परंतु, मे महिन्याच्या अखेरपर्यंत जागरुक राहावे लागणार आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्राला मे महिन्याच्या अखेर पर्यंत ग्रीन झोन बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

24 मार्चपासून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर हा कालावधी 19 दिवसांनी वाढवत 3 मे करण्यात आला. परंतु, 3 मे नंतर पुन्हा लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला. पण तिसऱ्या टप्प्यात झोननुसार, सेवा-सुविधांमध्ये काही सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे 17 मे नंतर रेड झोनबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment