विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता इतर विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरु लॉकडाऊनमुळे महाविद्यालयीन, विद्यापीठांच्या परीक्षा सोबतच इतर स्पर्धा परीक्षा आणि सीईटी परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वर्षाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अनेक संभ्रम होते. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षांबद्दलचा गोंधळ दूर करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यामातून संवाद साधला.

युजीसीने काही दिवसांपूर्वीच एक अहवाल जाहीर करत देशभरात विद्यापीठांच्या परीक्षांच्या वेळापत्रकासाठी मार्गदर्शकतत्वे जारी केले होते. आता त्यानुसार महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. अंतिम वर्गाची अंतिम सत्राची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रेड आणि मार्क्स मेंटेन करण्यासाठी विशेष गुणपद्धती दिली जाईल. पुढील वर्षी ग्रेडिंग सुधारण्यासाठी विशेष परीक्षा पुढल्या वर्षी घेतल्या जातील. त्याचबरोबर ज्या परीक्षा मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई विद्यापीठामध्ये झाल्या त्यांचे सर्वोत्तम मार्क निवडून ग्रेडिंग ठरवले जाईल. तर अंतिम वर्षाच्या परीक्षा युजीसीच्या गाईडलाईननुसार होईल. सीईटी परीक्षा महाराष्ट्रात 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जुलै महिन्यात घेतल्या जातील. सीईटीच्या परीक्षा 1-15 जुलै दरम्यान तर सीईटीच्या पीजीच्या परीक्षा 23-30 जुलै दरम्यान घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना यासंदर्भात काही शंका असल्यास त्यांनी संबंधित विद्यापीठाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती पाहता आता राज्य सरकार युजीसीने दिलेल्या गाईडलाईननुसार 1 ते 31 जुलै दरम्यान परीक्षा घेण्याचा प्रयत्न करेल.

दरम्यान महाराष्ट्रात सीईटी परीक्षांच्या प्रवेशप्रक्रियेचे अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती तर काही दिवसांपूर्वीच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक जेईई मेन आणि अ‍ॅडव्हान्स परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. तर नीट 2020 या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेची तारीख जाहीर झाली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील परीक्षांच्या वेळापत्रकाचे वेध लागले होते.

उदय सामंत यांनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एकाही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना दिलासा देताना काल मंत्री आदित्य ठाकरेंनी देखील लवकरच शिक्षणमंत्र्यांकडून वेळापत्रकाबद्दल संभ्रम दूर केला जाईल, असे सांगितले होते. तर महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनमध्येही 10, 12 वीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. त्यामुळे यंदा बोर्डाचे निकाल देखील 10 जूनपर्यंत लागू शकतात असा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Comment