व्हायरलः सायन रुग्णालयात धक्कादायक प्रकार; मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार


मुंबई – भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या सायन येथील महानगर पालिकेच्या रुग्णालयात मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडीओ ट्विट करत आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही मृतदेह रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. रुग्णावर त्यांच्या शेजारीच उपचार सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी यावेळी पालिका आयुक्तांना जर परिस्थितीत हाताळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील केली आहे.


मृतदेहांच्या शेजारी झोपून सायन रुग्णालयात रुग्ण हे उपचार घेत आहेत. हे कोणत्या प्रकारचे प्रशासन आहे. हा प्रकार अतिशय लज्जास्पद असल्याचे म्हणत राणे यांनी ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटनंतर काही वेळातच मोठ्या प्रणामात हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी देखील तो व्हिडीओ सायन रुग्णालयातील असल्याची कबुली दिली आहे. काही जणांचे नातेवाईक त्यांचे मृतदेह घेण्यासाठी आले नाहीत म्हणून आम्ही ते त्या ठिकाणी ठेवले आहेत. यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांनी कसली अपेक्षा ठेवावी? खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना घेत नाहीत आणि सरकारी रुग्णालयांमध्ये अशी परिस्थिती आहे. ही आरोग्य आणीबाणी आहे का, असे राणे म्हणाले.


सायन रुग्णालयाकडून हा व्हिडीओ बनावट असल्याचे काल रात्रीपासून सांगण्यात येत होते. परंतु यावर आता त्यांनी धक्कादायक उत्तर दिले आहे. आता पालिका प्रशासनावर आणि आरोग्य विभागावर विश्वास राहिला नाही. पालिका आयुक्तांना जर परिस्थिती हाताळणे जमत नसेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी राणे यांनी केली आहे.

Leave a Comment