देशाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी जास्त मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण


मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगरी मुंबईचे परदेशातून आलेल्या कोरोनाबाधित प्रवाशांमुळे प्रचंड हाल होताना दिसत आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण प्रचंड गर्दी असणाऱ्या या शहरात आढळून आले आहेत. त्यात आता चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणेज देशाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी जास्त मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण आहे. देशात हे प्रमाण सरासरी ३ टक्के आहे, तर मुंबईतील प्रमाण १५ टक्क्यांवर पोहोचले असल्यामुळे यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काळजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आढावा घेतला. आरोग्यमंत्र्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपस्थित अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवून संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या करण्याची सूचना दिली. या सगळ्यांमध्ये दिलासादायक बाब म्हणजे या बैठकीत मुंबईसह देशात कुठेही अजून कम्युनिटी ट्रान्समिशन झाले नसल्याची माहिती देण्यात आली.

या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसला सूत्रांनी माहिती दिली. काळजी करण्यासारखी मुंबईतील परिस्थिती झाली असून देशात १२,७६,७८१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात ५०,००० जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. म्हणजे देशातील पॉझिटिव्ह रूग्णांचे प्रमाण सध्या ३ टक्के आहे. दुसरीकडे मुंबईत ७३ चाचण्या करण्यात आल्या असून, ११,००० जणांना कोरोनाबाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणजेच मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण १५ टक्के असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे.

आणखी २५ रुग्णांच्या मृत्यूची बुधवारी नोंद झाली असून ४१२ वर मृतांचा आकडा गेला आहे. मृतांमध्ये १५ पुरुष व १०महिला आहेत. तर सहा रुग्णांना कोणताही आजार नव्हता. मुंबईतील कोरोना रुग्णांचा मृत्युदर ३.९ टक्के आहे. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन येत्या १५ दिवसात मुंबईत आणखी कोरोना काळजी केंद्र उभारण्याचे पालिकेने ठरवले आहे. महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरू विज्ञान केंद्र, बीकेसी येथील एमएमआरडीए मैदान, माहीम निसर्गोद्यान, गोरेगाव येथील नेस्को मैदान या ठिकाणी कोरोना काळजी केंद्र -२ सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना काळजी केंद्रातील खाटांची संख्या ३४ हजार होणार आहे. जे रुग्ण कोरोनाबाधित आहेत पण त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत अशा रुग्णांना या सीसीसी २ केंद्रात ठेवले जाणार आहे. विशेषत: जे रुग्ण झोपडपट्टय़ांमध्ये राहतात अशा रुग्णांना येथे ठेवले जाणार आहे.

Leave a Comment