‘ठाकरे सरकार’ला राज ठाकरे यांच्या महत्वाच्या सूचना


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील सर्व विरोधीपक्षाच्या नेत्यांबरोबर मंत्रालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही यावेळी उपस्थित होते. राज ठाकरे दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मंत्रालयामध्ये या बैठकीसाठी पोहचले. या बैठकीनंतर राज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना दिलेल्या सूचनासंदर्भात माहिती दिली. आपण सरकारला लॉकडाउन उठवण्यापासून ते रोजगारासंदर्भात १२ सुचना दिल्या आहेत.

 • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे मागील दीड महिन्यापासून आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस कर्मचारी आता थकले आहेत. त्याचबरोबर अतिरिक्त कामामुळे पोलिसही तणावाखाली आहेत. तसेच राज्यात सध्या रमजानचा काळ देखील सुरु आहे. पोलिसांना महाराष्ट्रातील काही भागांमध्ये काहीजण अगदीच गृहीत धरायला लागले आहेत. अशा ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) नेमणूक करावी.
 • एसआरपीएफच्या तुकड्या त्याठिकाणी तैनात केल्यामुळे पोलिसांना अगदीच गृहीत धरल्या जाणाऱ्या भागांमध्ये धाक निर्माण होऊन तेथील लोक घराबाहेर पडणार नाहीत. सध्याचा काळ हा रमजानचा असून अनेक लोक घराबाहेर येत आहेत. अनेक सण आपण घरामध्ये साजरे केले. या गोष्टीचा विचार मुस्लीम समाजाने करणे देखील गरजेचे आहे. विचार होत नसेल तर अशा ठिकाणी अतिरिक्त फोर्स लावणे गरजेचे आहे.
 • अनेक ठिकाणी छोटे दवाखाने सुरु करावेत जेणे करुन काहीजण आजारी पडत आहेत. त्यांच्यावर वेळेत उपचार होऊ शकतील. पण सध्या अनेक दवाखाने बंद असल्यामुळे हे छोटे दवाखाने फायद्याचे ठरतील. हे दवाखाने सुरु करताना तिथे एखादा पोलीस नियुक्त करावा. म्हणजे जास्त गर्दी झाल्यास, त्यावर तो नियंत्रण करु शकतो.
 • सरकारने त्वरित स्पर्धा परिक्षांसाठी आलेल्या तसेच हॉस्टेलमध्ये अडकलेल्यांसाठी काय व्यवस्था करता येईल यासंदर्भात निर्णय घ्यावा.
 • परप्रांतियांची तपासणी केल्याशिवाय त्यांना पुन्हा राज्यात घेऊ नये. त्या राज्यांमध्ये काय परिस्थिती असेल आपल्याला माहित नाही. कारण येथे चाचण्या होत आहेक, आपण बघत आहोत पण तिकडे काय परिस्थिती आहे आपल्याला माहित नाही. ते महाराष्ट्रातून ज्या पद्धतीने बाहेर गेले आहेत. तेव्हा ते परत येतील त्यांना तपासणीशिवाय प्रवेश देऊ नये.
 • परप्रांतिय परत आल्यानंतर त्यांची त्याचवेळी राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ती योग्य वेळ आहे कारण हे नंतर करता येणार नाही. या सर्व गोष्टींमध्ये आजपर्यंत गोंधळ झाला होता. पण ही वेळ तो गोंधळ सुधारण्याची असल्याचे मला वाटते.
 • जे परप्रांतिय परत आपल्या राज्यात गेले आहेत त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील एखादा उद्योग अथवा कारखाना बंद पडू नये, यासाठी महाराष्ट्रातील जे तरुण तरुणी आहेत त्यांची नोंद करुन जिथे जिथे रोजगार उपलब्ध आहेत, या रोजगाराची त्यासंदर्भातील माहिती गरज असणाऱ्यांपर्यंत पोहचवावी.
 • मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भामधील तरुणांना रोजगार कुठे उपलब्ध आहे ठाऊक नसते. तर आजच्या घडीला परप्रांतिय बाहेर गेले आहेत या पार्श्वभूमीवर रोजगार कुठे उपलब्ध आहे हे या मुलांना कळवावे जेणे करुन त्यांना रोजगार उपलब्ध होईल. आज अगदी भाजी विकणाऱ्यांपासून ते कारखान्यामध्ये काम करणाऱ्यांपर्यंत अनेकजण बाहेर गेले आहेत आणि स्थानिकांना रोजगार देण्याची संधी आहे, तर महाराष्ट्र शासनाने ती संधी घालवू नये.
 • शाळा जून महिन्यामध्ये कशापद्धतीने सुरु करणार, त्याचबरोबर इ-लर्निंगवैगरे सारख्या गोष्टी सगळ्या ठिकाणी शक्य नाही. तर शाळा कशा सुरु करणार यासंदर्भातील माहिती पालकांना देणे गरजेचे आहे. यासंदर्भात निर्णय घ्यावा. सध्या मे महिना सुरु आहे. शाळांचे अडमिशन्स जून महिन्यामध्ये सुरु होतात. तर त्या कशा होणार याबद्दलची माहिती पालकांना कळवण्यात यावी.
 • सुरक्षेची साधने पालिका कर्मचारी, सरकारी कामगार, सफाई कर्मचाऱ्यांना मिळत नाही आहेत. पाच पाच सहा सहा वेळा एक मास्क वापराल जात आहे. ही गोष्ट योग्य नाही. सफाई कामगार आजारी पडत आहेत. त्यांनी हात वर केल्यास काय होणार? सर्व शहरे अस्वच्छ होतील. तर अशा लोकांकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.
 • लॉकडाउनचा एक्झीट प्लॅन काय आहे? १५ दिवसांनी किंवा कधीही लॉकडाउन काढावा लागणार एवढे मात्र निश्चित आहे. पण जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत लॉकडाउन ठेवता येणार नाही. लॉकडाउन काढायच्या १० ते १५ दिवस आधी लोकांना सांगणे गरजेचे आहे. कशा पद्धतीने पुढे जायचे आहे, पुढे कसे जायचे आहे, एक दिवस सुरु केले दुसऱ्या दिवशी बंद असे करुन चालणार नाही. राज्य सरकारने लोकांसमोर एक्झीट प्लॅन ठेवावा.

Leave a Comment