उत्तर प्रदेशने पहिल्याच दिवशी विकली १०० कोटी पेक्षा जास्त रक्कमेची दारू


लखनऊ – दारू विक्रीला लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात परवानगी मिळताच वेगवेगळयां राज्यांमधील दारूच्या दुकानांबाहेर लांबच्या लाब रांगा लागल्याचे चित्र काल पाहायला मिळाले. दुकानांबाहेर दारू खरेदीसाठी झुंबड उडाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला. काही राज्यातील पोलीसांना दारुच्या दुकानांबाहेर झालेली गर्दी आवरण्यासाठी लाठी चार्जदेखील करावा लागला. यासंर्दभातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

मुंबईतील दारुची दुकाने उघडायला परवानगी द्यायची की, नाही या गोंधळातच काही तास वाया गेले. अखेर उशिराने का होईना पण दारु विक्रीचा आदेश देण्यात आला. मंगळवारी सकाळी बहुतांश मालकांनी दुकान उघडायचे ठरवले आहे. तर सोलापूर शहर आणि औरंगाबादमध्ये जिल्हा प्रशासनाने दुकाने उघडण्याची परवानगी दिली नाही.

बंगळुरुमध्येही दुकानांबाहेर लागलेल्या रागांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे मोठया प्रमाणावर उल्लंघन झाले. अनेकांनी स्वत:साठी दुसऱ्यांना रांगेत उभे केले होते. दारूची दुकाने सुरु होताच पहिल्याच दिवशी अनेक राज्यांना बऱ्यापैकी महसूल मिळाला आहे.

सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे देशासह राज्यांचे अर्थचक्र ठप्प असल्यामुळे देशातील सगळयाच राज्यांच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. तर उत्तर प्रदेशातील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल पहिल्याच दिवशी (सोमवार) १०० कोटी पेक्षा जास्त रक्कमेची दारू विक्री झाली. उत्तर प्रदेशात लॉकडाउन नसताना दिवसाला सरासरी ७० ते ८० कोटीपर्यंत दारूची विक्री होते. राज्याची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये ६.३ कोटी दारूची विक्री झाली. स्टॉक संपल्यामुळे अनेकांना दुपारनंतर दुकाने बंद करावी लागली.

Leave a Comment