राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 14 हजार 541 वर, एकट्या मुंबईत 9 हजार 310 कोरोनाग्रस्त


मुंबई : राज्यात काल 771 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसातील राज्यातील मनपा आणि जिल्ह्याची आयसीएमआर यादीनुसार काल अद्ययावत आकडेवारी ही जाहीर करण्यात आली. त्या आकडेवारीनुसार 14 हजार 541 वर राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला आहे. एकट्या मुंबईत 9 हजार 310 कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या झाली असून, मुंबई महापालिका हद्दीतील मृतांचा एकूण आकडा 361 एवढा झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, काल 350 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कालपर्यंत राज्यात 2465 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

काल राज्यात 35 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. काल झालेल्या मृ्त्यूंपैकी मुंबईमधील 18, पुण्यातील 7, अकोला मनपातील 5, सोलापूर जिल्ह्यातील 1, औरंगाबाद शहरात 1, ठाणे शहरात 1 आणि नांदेड शहरात 1 मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू काल मुंबईत झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 583 झाली आहे.

काल झालेल्या मृत्यूंपैकी 22 पुरुष तर 13 महिला आहेत. काल झालेल्या 35 मृत्यूंपैकी 60 वर्ष किंवा त्यावरील 13 रुग्ण आहेत, तर 19 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 जण 40 वर्षाखालील आहेत. मृत रुग्णापैकी दोघांच्या इतर आजारांबद्दलची माहिती मिळालेली आहे. उर्वरित 33 जणांपैकी 23 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 76 हजार 323 नमुन्यांपैकी 1 लाख 62 हजार 349 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले असून, 14 हजार 541 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यत राज्यातून 2 हजार 465 रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात 1 लाख 98 हजार 42 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून, 13,006 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत असे राजेश टोपे म्हणाले.

Leave a Comment