दारूच्या दुकानाबाहेर उभ्या असलेल्या महिलांवरुन राम गोपाल वर्मा आणि सोना मोहपात्रामध्ये जुंपली


आपल्या वादग्रस्त पण बेधडक वक्तव्यामुळे दिग्दर्शक-निर्माते रामगोपाल वर्मा हे ओळखले जातात. त्यांनी एखाद्या गोष्टीवर मत मांडले आणि त्यावरुन वाद झाला नाही, असे क्वचितच घडते. त्याचप्रमाणे सध्या त्यांचे एक ट्विट भलेतच चर्चेत आहे. केंद्र सरकारने देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या तिस-या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी दिली आणि तळीरामांच्या देशभरातील दारूच्या दुकानाबाहेर लांबच्या लांब रांगाच लागल्या. यावर आता रामगोपाल वर्मा काही बोलणार नाही, असे होऊच शकत नाही. पण त्यांनी यावर निरीक्षण नोंदवताना त्यांचे नेमके लक्ष दारूच्या दुकानांबाहेरच्या रांगेत उभ्या असलेल्या महिलांकडे गेले. त्यांनी दारूच्या दुकानापुढे महिलांची रांग पाहून एक ट्विट केले आणि त्यांच्या या ट्विटमुळे गायिका सोना मोहपात्रा चांगलीच वैतागली आहे.


रामगोपाल वर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये दारूच्या दुकानाबाहेर असलेल्या रांगेत कोण उभे आहे, ते एकदा पाहा, आणि त्याच नंतर दारू पिणा-या पुरूषांबद्दल गळे काढतात…, असे म्हटले आहे.


बॉलिवूडची गायिका सोना मोहपात्रा हिला राम गोपाल वर्मांचे हे म्हणने खटकले आणि तिने राम गोपाल यांच्यावर आपला राग व्यक्त केला. सोना मोहपात्राने आपल्या ट्विटमध्ये, राम गोपाल वर्मा तुम्हाला देखील एका लाईनमध्ये उभे होण्याची गरज आहे. तुम्हाला जिथे खरे शिक्षण मिळेल. पुरूषांप्रमाणे महिलांना देखील दारु खरेदीचा अधिकार आहे. पण हो, कुणालाही दारु पिऊन हिंसा करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment