उद्धव ठाकरेंची केंद्राला घरी परतणाऱ्या मजूर, कामगारांकडून तिकीटाचे पैसे न घेण्याची विनंती


मुंबई – लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी परराज्यातील मजूर आणि कामगारांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे. हे सर्व गरीब असून त्यांची आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे खालावलेली आहे, याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून त्यांच्याकडून रेल्वेने तिकीटाचे पैसे घेऊ नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंत्रालयातील सचिव, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत बोलत होते.

राज्यातील अडकलेल्या मजूर, कामगार व श्रमिकांची पाठवणी गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या राज्यात सुरु झाली आहे. विशेष रेल्वे भिवंडी, नाशिकहून रवाना झाल्या आहेत. या सगळ्यावर मंत्रालय नियंत्रण कक्षाद्वारे देखरेख व समन्वय ठेवण्यात येत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, छत्तीसगड अशा राज्यातील मजूर राज्यात अडकलेल्या मजुरांमध्ये मोठ्या संख्येने आहेत. राज्य शासनाने सुमारे ५ लाख परप्रांतीय मजुरांना निवारा देऊन तसेच जेवणाखाण्याची साधारणत: ४० दिवस व्यवस्था केली तसेच जोपर्यंत सर्वजण आपापल्या ठिकाणी जात नाहीत तोपर्यंत ती व्यवस्था आजही सुरूच आहे.

रोजीरोटी कमावणारे व हातावर पोट असणारे हे मजूर आहेत. ते गरीब असून कोरोनामुळे हतबल झाले आहेत, अशा परिस्थितीत त्यांना रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी पुरेसे पैसेही नसतील. काही ठिकाणी तर स्वयंसेवी संस्था, व संघटना यांनी तिकिटाचे कमी पडलेले पैसे भरून या मजुरांना दिलासा दिल्यामुळे त्यांचे जर तिकिटाचे पैसे माफ केले तर या काळात त्यांना आधार मिळेल, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.

सध्या या राज्यांतील कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी रेल्वेशी देखील चांगला समन्वय ठेवण्यात आला आहे. इतर राज्य सरकारांशी सुद्धा चांगला समन्वय ठेवावा तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी व इतर कागदपत्रे यांची पूर्तता करून घेऊन त्यांना पाठवावे. यामध्ये कुठेही गोंधळ होऊ नये, असे निर्देश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

निवारा केंद्रातील सर्व कामगारांची यादी अद्ययावत करावी तसेच आज ना उद्या मुंबई, ठाणे , पुणे येथून विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय झाल्यास या कामगारांच्या प्रवासाचे व्यवस्थित नियोजन जिल्हाधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावे, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. राज्यांतर्गत ठिकठिकाणी अडकलेल्या व्यक्ती व प्रवाशांचे गट यांना त्या त्या जिल्ह्यांत जाण्याची परवानगी ही सर्व बाबींचा विचार करून व लॉकडाऊन नियमाप्रमाणे करावी. तसेच यात तक्रारी येऊ देऊ नयेत. अडकलेल्या व्यक्ती या नागरिक आहेत, परिस्थितीमुळे त्यांना थांबावे लागले आहे त्यादृष्टीने याकडे पाहावे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

Leave a Comment