‘डाक बंगले’ – असा आहे त्यांचा रोचक इतिहास

bungalow
भारतामध्ये ब्रिटीशांची सत्ता असतानाच्या काळामध्ये अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या लहान लहान गावांमध्ये नोकरीनिमित्त बदल्या होत असत. त्यावेळी त्यांना राहण्यासाठी त्या त्या गावांमध्ये ‘डाक बंगले’ असत. आडबाजूला, निबिड प्रदेशामध्ये असलेल्या खेडेगावांमध्ये राहण्यासाठी आलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांसाठी, हे डाक बंगले त्यांचे निवासस्थान, त्यांचे कार्यालय आणि मनोरंजनाचे ठिकाण असे. या व्यतिरिक्त इतर पर्याय उपलब्ध नसे. पण मुळात प्रश्न हा, की हे डाक बंगले मुद्दाम इतक्या आडगावांमध्ये का बांधले जात असत? यामागे ही काही कारणे आहेत.
bungalow1
‘डाक’ हा शब्द मुळचा उर्दू असून, याचा अर्थ टपाल किंवा पोस्ट असा आहे. ‘ब्रिटीश इंडियन पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट’ च्या अंतर्गत पोस्ट खात्यामध्ये कार्यरत असणाऱ्या करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हे डाक बंगले बांधविले गेले होते. तसेच काही कामांच्या निमित्ताने जेव्हा ब्रिटीश अधिकाऱ्यांना अगदी आडबाजूच्या गावांमध्ये जावे लागे, तेव्हा तिथे पोहोचल्यानंतर तंबूंमध्ये राहण्याचा पर्याय फारसा पसंत केला जात नसे. विशेषतः पावसाळ्यामध्ये तर तंबूंमध्ये किंवा एखाद्या कॅम्पमध्ये राहणे शक्यच नसे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची राहण्याची सोय देखील या डाक बंगल्यांमध्येच केली जात असे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ही डाक बंगले खूपच वापरामध्ये असत. ब्रिटीशांची सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाली खरी, पण त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या जनतेच्या मानाने ब्रिटीश अधिकाऱ्यांची संख्या फारच तोकडी होती. त्यामुळे या अधिकाऱ्यांना वरचेवर फिरतीवर राहून त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रांतावर निगराणी ठेवावी लागत असे. वारंवार फिरतीवर असताना राहण्याची सोय म्हणून ठिकठीकाणी असलेल्या डाक बंगल्यांचा वापर होत असे.
bungalow2
थेट हिमालयाच्या पायथ्यापासून भारताच्या दक्षिणी तटापर्यंत डाक बंगले बहुधा सर्वच लहान गावांमध्ये असत. गाव कुठलेही असले, तरी हे सर्वच डाकबंगल्यांची बांधणी एकसारखीच असे. यांच्या बांधणीच्या, रचनेच्या पद्धतीमध्ये फरक नसे. हे डाक बंगले साधेच, पण युरोपियन धाटणीने बांधलेले, लांब-रुंद व्हरांडे असलेले, उंच छते असलेले आणि अतिशय सुबक, नेटके असे. यामध्ये यामध्ये एक दिवाणखाना असून, त्याच्या दोन्ही बाजूला खासगी कक्ष असत. त्या त्या गावांमध्ये बांधकामासाठी उपलब्ध असलेले साहित्य वापरले जाऊन, हे डाक बंगले गावातील भरवस्ती मध्ये बांधले जात नसून, वस्तीपासून सुमारे वीस-पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर बांधले जात असत. क्वचित हे डाक बंगले गावाच्या जवळच्या डोंगरांवरही किंवा जंगलामध्येही बांधले जात असत.
bungalow3
या बंगल्यांची निगा राखण्यासाठी एक ‘केअर टेकर’ किंवा राखणदार नियुक्त केलेला असे. येथे राहण्यास येणाऱ्या अधिकाऱ्यांची उत्तम बडदास्त ठेवण्याचे आणि बंगल्याच्या एकंदर देखरेखीचे काम या केअर टेकरचे असे. आलेल्या पाहुण्यांसाठी भोजन बनविण्याची जबाबदारीही या केअर टेकरचीच असे. डाक बंगल्यांमध्ये राहण्यासाठी येणारे पाहुणे बहुतेक वेळी आपली माणसे आणि आपल्या गरजेच्या वस्तू बरोबर घेऊनच येत असत, आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्या इतर गरजा पूर्ण करण्याचे कामही हा केअर टेकर करीत असे. डाक बंगल्यांच्या आवारामध्ये स्थानिक भाजीपाला पिकविला जात असून, कोंबड्याही पाळल्या जात असत. त्यामुळे भोजनासाठी लागणारे सर्व साहित्य येथे अगदी आडवेळेलाही उपलब्ध असे. हे डाक बंगले बहुतेक वेळी आडबाजूला, गावातील वस्तीपासून लांब असल्याने यांच्याशी निगडीत अनेक चित्र विचित्र कथा कानी येत असत. त्यातूनही एखाद्या डाक बंगल्यामध्ये तिथे राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालाच तर त्या व्यक्तीचे भूत तिथे अस्तित्वात असल्याच्या कथा लगेच सर्वांच्या तोंडी होत असत. असे हे डाक बंगले आता मात्र कालबाह्य झाले आहेत.

Leave a Comment