काल दिवसभरात राज्यात 1008 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकट्या मुंबईत 751 रुग्ण


मुंबई : काल दिवसभरात राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 1008 नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 11,506 वर पोहचला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिलासादायक बाब म्हणजे काल 106 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत राज्यात एकूण 1879 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

दरम्यान, काल 26 कोरोनाग्रस्तांचा राज्यात मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी पुणे शहरातील 10, मुंबईचे 5, जळगावमधील 3 जण तर पुणे जिल्ह्यातील 1, सिंधुदुर्गमधील 1, भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील 1, ठाणे महापालिकामधील 1, नांदेडमधील 1, औरंगाबाद महापालिका क्षेत्रामधील 1 तर परभणीतील एकाचा समावेश आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मुंबईत मृत्यू झाला आहे.

काल झालेल्या मृत्यूंपैकी 18 पुरुष तर 8 महिला आहेत. तसेच काल झालेल्या 26 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 14 रुग्ण आहेत तर 11 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर एक जण 40 वर्षांखालील आहे. या 26 रुग्णांपैकी 15 जणांमध्ये (58 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 53 हजार 125 नमुन्यांपैकी 1 लाख 40 हजार 587 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 11 हजार 506 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 63 हजार 26 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून 11 हजार 677 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Leave a Comment