व्हिडीओ व्हायरल; घरवापसीसाठी मजुरांचा सिमेंट मिक्सरमधून धोकादायक प्रवास


नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जारी केल्यामुळे इतर राज्यातील अनेक मजूर आपल्या घरापासून लांब परराज्यात अडकले आहेत. या मजूरांना लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका बसला आहे. राहायला घर नाही, हाताला काम नसल्यामुळे पैसा नाही, त्यात हा जीवघेणा आजार पसरत असल्यामुळे इतर राज्यातील प्रत्येक मजूर आपल्या स्वगृही परतण्यासाठी या ना त्या मार्गाने प्रयत्न करत आहेत.


याच दरम्यान एक सिमेंट मिक्सर मध्य प्रदेशमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतला असून तब्बल 18 मजूर त्या सिमेंट मिक्सरच्या मोठ्या भांड्यातून महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशतील आपल्या घरी निघाले होते. मध्य प्रदेशमध्ये पोलिसांना या सिमेंट मिक्सरबाबत संशय आल्यानंतर या मिक्सरची त्यांनी तपासणी केली असता या मिक्सरच्या एका फुटाच्या होलातून तब्बल 18 मजूर बाहेर पडले. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या मिक्सरच्या भांड्यात गडद अंधार, कोंदट वातावरण, धड बसायलाही नीट जागा नाही अशा परिस्थितीत जीवावर उदार होऊन हे मजूर त्यांच्या गावाकडे निघाले होते. मध्य प्रदेश पोलिसांनी त्या मजूरांना ताब्यात घेतले असून सिमेंट मिक्सर व त्याच्या चालकालाही ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment