राज्यांतर्गत प्रवास करण्यासाठी राज्य सरकारची नवीन नियमावली


मुंबई : राज्यातील विविध जिल्हे आणि शहरात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या विद्यार्थी, प्रवासी, पर्यटक, कामगार यांना घरी पोहचवण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून त्याच पार्श्वभूमीवर राज्यांतर्गत प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. ज्या शहरात किंवा जिल्ह्यात कंटेनमेंट झोन आहेत, अशा भागातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होणार नसल्याचे या नव्या नियमावलीत सांगण्यात आले आहे.

देशभरात विविध राज्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर लोक लवकरच स्वगृही परतणार आहेत. ‘कामगार दिन’ म्हणजे कालपासून या सर्वांना आपापल्या घरी पोहचवण्यासाठी “श्रमिक विशेष” रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. गृहमंत्रालयाने त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा अडकलेल्या लोकांना पाठवणे किंवा स्वगृही आणण्यासाठी प्रोटोकॉलनुसार संबंधित दोन्ही राज्य सरकारच्या विनंतीनुसार या विशेष गाड्या एकाच ठिकाणी चालवल्या जातील. या श्रमिक स्पेशलच्या समन्वय आणि सुरळीत कारभारासाठी रेल्वे आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

Leave a Comment