विरोधकांकडून आयएफएससी संदर्भात भ्रम पसरवण्याचा प्रयत्न


मुंबई – केंद्र सरकारने मुंबई येथील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचे (आयएफएससी) गुजरातमधील गांधीनगरमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. महानगरी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र येथे सुरु न करता ते गुजरातला नेणे हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. यावर माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधीपक्ष नेते तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. विरोधकांकडून मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरु असून आपले अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार आहे. काही लोकांना नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी केवळ सोयीच्या गोष्टींचे स्मरण होते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.


केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीने फेब्रुवारी 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन करण्यासंदर्भात अहवाल सादर केला होता. केंद्र किवा राज्य सरकारने 2007 ते 2014 दरम्यान कोणतीही कार्यवाही केली नाही किंवा त्यासंबंधीचे पत्र किंवा साधा अर्जही पाठवण्यात आला नाही. दरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याच काळात 2007 साली त्या संधीचा फायदा घेतला. त्यांनी 2012 पर्यंत कार्यवाही पूर्ण केली आणि काम सुरु केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच केंद्र सरकारने डिसेंबर 2019 मध्ये वित्तीय सेवा केंद्र नियमनासाठी प्राधिकरण गठित केले आणि त्याचे मुख्यालय हे अहमदाबाद येथे अधिसूचित केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जे लोक आज गळे काढून ओरडत आहेत, ते 2007 ते 2014 या काळात सत्तेत होते. मुंबईच्या आयएफएससीसाठी त्यांनी शून्य योगदान दिल्याची टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आयएफएससीमधील बँकिंग, भांडवली बाजार आणि विमा क्षेत्रांचे अनेक नियामक – आरबीआय, सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण द्वारे नियमन केले जाते. 27 एप्रिल 2020 रोजी अधिसूचनेनुसार केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण स्थापना केली होती. गांधीनगर, गुजरात येथे या प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय असेल, अशी माहिती यात देण्यात आली आहे. गांधीनगर येथे आयआयएफसी प्राधिकरण मुख्यालय उभारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे जीआयएफटी सिटीचे एमडी आणि ग्रुप सीईओ तपन रे यांनी स्वागत केले आहे.

Leave a Comment