जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 33 लाखांवर; तर 2 लाख 34 हजार मृत्यू


मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचे मृत्युतांडव सुरुच असून यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार या जीवघेण्या व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत 2 लाख 34 हजार 075 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 33 लाख 7 हजारांवर पोहोचली आहे. जगभरातील 10 लाख 39 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण रुग्ण संख्येत मागील 24 तासात 85,960 नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे, तर 5800 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 10,95,023 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 63,856 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनामुळे 24,543 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2,39,639 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 27,967 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,05,463 एवढा आहे. जगातील अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन हे पाच देश असे आहेत जिथे कोरोनामुळे 20 हजाराहून अधिक बळी गेले आहेत. एकट्या अमेरिकेत कोरोनाचे 60 हजारांहून अधिक बळी गेले आहेत.