राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दहा हजारांच्या पार


मुंबई : राज्यातील कोरोना ग्रस्तांच्या आकड्यात काल 583 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 10,498 झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, राज्यात काल 27 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 20 जण मुंबईचे तर पुण्यातील 3 आणि ठाणे शहरातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 459 जणांचा मृत्यू झाला आहे. 583 कोरोनाबाधित रुग्णांना काल डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कालपर्यंत राज्यातून पाठवण्यात आलेल्या 1 लाख 45 हजार 798 नमुन्यांपैकी 1 लाख 34 हजार 244 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 10,498 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 68 हजार 266 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 10 हजार 695 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 1773 कोरोनाग्रस्त रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी 19 पुरूष तर 8 महिला आहेत. त्यातील 14 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 13 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 31 रुग्णांपैकी 22 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

Leave a Comment