कोरोनामुळे ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच बदलणार हा नियम


वेगाने फोफावणाऱ्या कोरोना व्हायरस मुळे जगभरातील अनेक उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. अनेक देशांमध्ये सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त कोणतेही उद्योगधंदे बंद आहेत. त्याला जगभरातील सिनेसृष्टी देखील अपवाद नाही. कोरोनामुळे चित्रपट उद्योग पूर्णपणे ठप्प पडला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक मोठमोठ्या निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. चित्रपट निर्मात्यांना कोरोनामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे.

काही जणांनी या नुकसानीतून बाहेर येण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मचा रस्ता निवडला आहे. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची वाट पाहण्यापेक्षा OTT अर्थात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय काही निर्मात्यांनी घेतला आहे. दरम्यान ऑस्करने या प्रतिकूल परिस्थितीची नोंद घेत आपल्या नियमांमध्ये एक बदल केला आहे. आता या नव्या नियमानुसार ऑस्करच्या स्पर्धेत ऑनलाईन प्रदर्शित झालेले चित्रपट देखील भाग घेऊ शकतील.


सिनेसृष्टीत ऑस्कर हा प्रतिष्ठेचा असा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. जगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या पंक्तीत हा पुरस्कार पटकावणाऱ्याला स्थान मिळते. ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायंस’ या संस्थेमार्फत हा प्रतिष्ठीत पुरस्कार दिला जातो. या संस्थेच्या नियमानुसार केवळ थिएटरमध्येच प्रदर्शित झालेले चित्रपट ऑस्कर स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जातात. पण कोरोनामुळे ऑस्करने केवळ या वर्षासाठी नियमात बदल केला आहे. ऑस्करच्या ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच थिएटरऐवजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाही ऑस्कर स्पर्धेत भाग घेता येईल, अशी माहिती अ‍ॅकेडमी संस्थेने ट्विट करुन दिली आहे.

Leave a Comment