एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हती ऋषी कपूर-नीतू सिंग यांची प्रेम कहाणी


आज वयाच्या 67व्या वर्षी बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचे आकस्मिक निधन झाले. काल रात्री उशिरा अचानक ऋषी कपूर यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान 2018 मध्ये पहिल्यांदा कर्करोग असल्याचे निदान झाल्यानंतर तब्बल 8 महिने न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या त्यांच्या खडतर प्रवासात त्यांच्या सोबत पत्नी नीतू सिंग कायम होत्या.

एखाद्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही आहे ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची लव्हस्टोरी. नीतू सिंग यांनी वयाच्या 21व्या वर्षी ऋषी कपूर यांच्याशी विवाह केला, तो फक्त पहिल्या नजरेत झालेल्या प्रेमामुळे. दोघांनी अनेक खडतर प्रवास एकमेकांसोबत पार केले. जहरीला इंसान हा ऋषी कपूर आणि नितू सिंग यांचा जोडीचा पहिला चित्रपट होता. त्यांची या चित्रपटामध्ये काम करताना मैत्री झाली. त्यावेळी नीतू सिंग या केवळ 14 वर्षांच्या होत्या. नीतू यांना पाहताच ऋषी कपूर त्यांच्या प्रेमात पडले. कदाचित यालाच पहिल्या नजरेतील प्रेम म्हणतात. ऋषी कपूर यांचे त्यावेळी नुकतेच ब्रेकअप झाले होते. त्यानंतर त्यांनी जहरीला इंसानच्या सेटवरच नीतू सिंग यांना प्रपोज केले आणि दुसऱ्या चित्रपटासाठी ते युरोपला गेले. पण त्याचे मन काही लागत नव्हते. त्यावेळी त्यांनी नीतू सिंग यांना टेलीग्राम पाठवला होता की, मला तुझ्याविना करमत नाही आहे.

बॉबी चित्रपटाच्या सेटवर ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचे प्रेम खुलले. नीतू आणि ऋषी कपूर यांनी अनेक चित्रपटात एकत्र भूमिका साकारल्या. ‘रफू चक्कर’, ‘दूसरा आदमी’, ‘कभी-कभी’, ‘अमर अकबर एंथोनी’ सारख्या चित्रपटांमध्ये लोकांनी त्यांच्या जोडीला खूप पसंत केले. ऋषी कपूर यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, मला फक्त हिच व्यक्ती सांभाळू शकते. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा 22 जानेवारी 1980मध्ये विवाह झाला. त्यावेळी नीतू सिंग फक्त 21 वर्षांच्या होत्या तर ऋषी कपूर 26 वर्षांचे. अगदी लहानवयात सुरू झालेली ही लव्हस्टोरी कायम स्मरणात राहिल.

ऋषी कपूर यांना 2018मध्ये कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांच्यासोबत नीतू सिंग कायम होत्या. त्यांनी कधीच त्यांची साथ सोडली नाही. मुंबईत आल्यानंतरही सावलीप्रमाणे ऋषी कपूर यांची काळजी घेतली. आजही त्यांच्या शेवटच्या क्षणी नीतू सिंग त्यांच्या सोबत होत्या.

Leave a Comment