भारतीय सिनेमाला रोमँटिक चेहरा देणाऱ्या ‘बॉबी’चा जीवन प्रवास


आज बॉलीवूडचा आणखी तारा निखळला असून, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान कालच बहुआयामी अभिनेता इरफान खान याचे निधन झाले होते. ऋषी कपूर यांना माझा पेपरच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…!

ऋषी कपूर यांना 2018 रोजी पहिल्यांदा कर्करोग असल्याचे समोर आल्यानंतर जवळपास 8 महिने न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. याआधी ऋषी कपूर किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही या आजाराबाबत खुलासा केला नव्हता. नंतर त्यांनी स्वत: आपल्या फॅन्सना या आजाराबाबत माहिती दिली होती. काल रात्री उशिरा अचानक ऋषी कपूर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते.

4 सप्टेंबर 1952 साली या अभिनेत्याचा जन्म झाला. ऋषी राज कपूर यांचा जन्म पंजाबच्या हिंदू कुटुंबात मुंबईच्या चेंबूरमध्ये झाला. अभिनेता-चित्रपट दिग्दर्शक राज कपूर यांचे द्वितीय चिरंजीव आणि अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे ते नातू होते. त्यांनी त्यांचे शिक्षण कॅम्पियन स्कूल, मुंबई आणि उर्वरित शिक्षण अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये आपल्या भावांसोबत केले. त्यांचे भाऊ रणधीर कपूर आणि राजीव कपूर, मामा प्रेम नाथ आणि राजेंद्र नाथ आणि काका, शशी कपूर आणि शम्मी कपूर हे सर्व अभिनेते आहेत. त्यांना रितु नंदा आणि रीमा जैन या दोन बहिणी आहेत.

दिवंगत पिता अभिनेते राज कपूर आणि आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्या पावलांवर पाऊल ठेवत ऋषी कपूर यांनी देखील चित्रपटांमध्येही काम करण्यास सुरुवात केली आणि यशस्वी अभिनेता म्हणून उदयास आले. मेरा नाम जोकर हा त्याचा पहिला चित्रपट आहे, ज्यात त्यांनी आपल्या वडिलांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. जो किशोरवयीन अवस्थेत आपल्या शिक्षिकेवर प्रेम करत असतो. पण बॉबी चित्रपटात ते मुख्य अभिनेते म्हणून उदयास आले. 22 जानेवारी 1980 साली ऋषी कपूर यांनी अभिनेत्री नीतू सिंग यांच्याशी विवाह केला. या दोघांना रणबीर आणि रिदीमा ही दोन मुले असून रणबीर हा सध्याच्या घडीला आघाडीचा अभिनेता आहे, तो रिदीमा ही एक ड्रेस डिझाइनर आहे. करिष्मा आणि करिना या त्यांच्या पुतण्या आहेत. ऋषी कपूर हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असायचे आणि त्यांच्या परखड मतामुळे जास्त ओळखले जायचे.

1970 सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. गेल्या 40 वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका निभावल्या. पत्‍नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. 90 च्या व 2000 च्या दशकात नायकाच्या भूमिका करणा-या ऋषी कपूर यांनी वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकेत बदल केला, कुछ तो है या सिनेमात ऋषी कपूर यांनी रंगविलेला सायको किलर खुर्चीला खिळवून ठेवतो तर अग्निपथ(नविन) मध्ये रौफ लालाची भूमिका चांगलीच गाजली होती. ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.

Leave a Comment