अन् व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदींना ट्विटरवर केले अनफॉलो!


मुंबई : अमेरिकेचे राष्ट्रपती कार्यालय व्हाईट हाऊसने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनफॉलो केले आहे. भारताने कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाच्या निर्यातीला मंजुरी दिल्यानंतर 10 एप्रिल रोजी व्हाईट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान मोदींना फॉलो करण्यात आले होते. पण त्यानंतर व्हाईट हाऊसने अवघ्या 19 दिवसातच मोदींना अनफॉलो केले आहे. व्हाईट हाऊसने या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपती भवनासह भारताचे एकूण पाच ट्विटर हॅण्डल व्हाईट हाऊसने फॉलो केले होते. यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि भारतातील अमेरिकन दूतावास या ट्विटर हॅण्डलला फॉलो केले होते. याशिवाय भारतामधील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांनाही फॉलो करण्यात आले होते.

पंतप्रधान मोदी हे व्हाईट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन फॉलो केले जाणारे जगातील एकमेव राजकीय नेते होते. अमेरिकेची भारत सातत्याने मदत करत असतानाही, अमेरिकेच्या राष्‍ट्रपती कार्यालयाने उचललेले हे पाऊल आश्चर्यकारक असल्याचे म्हटले जात आहे. भारताने कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत अमेरिका आणि ब्रिटन यासारख्या देशांसह जगभरातील अनेक देशांना मदतीचा हात पुढे केला आहे. या देशांनी नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतुक देखील केले होते. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्रपती कार्यालयाने अपवादात्मक परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हॅण्डलला फॉलो केले होते. यामुळे आता व्हाईट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन मोदींना अनफॉलो करण्यात आले आहे.

Leave a Comment