मुंबईतील कोरोनाग्रस्तावर करण्यात आलेली पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी


मुंबई – नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात करोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईमधील लिलावती रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरपी करण्यात आली असून त्यात यश मिळाल्याची माहिती दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख, कृषीमंत्री दादाजी भुसे, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्यधिकारी व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. राजेश टोपे यांनी ही माहिती बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

राजेश टोपे यांनी सांगितले की, प्लाझ्मा थेरपी लिलावती रुग्णालयात दाखल कोरोनाग्रस्त रुग्णावर करण्यात आलेली असून त्यात यश मिळाले आहे. ही थेरपी यशस्वी झाल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मला दिली आहे. आता दुसरी थेरपी नायर रुग्णालयात केली जाणार आहे. आपल्याला यश मिळेल असा विश्वास नायर रुग्णालयातील डॉक्टरांनीही व्यक्त केला आहे. पण ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यांचे पालन केले तरच थेरपी यशस्वी होत असल्याची माहिती मला देण्यात आली आहे. त्याचबरोबर हा प्रयोग पुण्यातही करणे शक्य आहे.

दरम्यान राजेश टोपे यांनी मालेगावमधील परिस्थितीवर बोलताना सांगितले की, दाटीवाटीची वस्ती असल्यामुळे अनेक ठिकाणी लोकाना घरात क्वारंटाइन होणे शक्य नाही. पण शक्य आहे तिथे संस्थात्मक क्वारंटाइन केले जावे अशी सूचना जिल्हाधिऱ्यांना देण्यात आली आहे. मालेगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्या पार्श्वभुमीवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

कोरोनाग्रस्तांसाठी २०० खाटांचे रुग्णालय वापरले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टर, नर्स जे पोस्टिंग केल्यानंतरही गेलेले नाहीत त्यांना २४ तास दिले आहेत. ते जर जॉईन झाले नाहीत तर निलंबन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. जायचेच नाही हा दृष्टीकोन योग्य नसल्याचे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

अनेकदा अज्ञानीपणामुळेही मृत्यू होत आहेत. अशाना समजावून सांगणे गरजेचे आहे. १२ मृत्यू जे झाले आहेत त्यांचा दाखल झाल्यानंतर २४ तासात मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयांना सरकार पीपीई किट देण्यात येणार आहेत. खासगी रुग्णालयांनी सहकार्य करण्यास नकार दिला तर कठोर कारवाई करावी लागेल. मालेगाव मिशन आपल्याला यशस्वी करायचे आहे, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत. मालेगावात काही ठराविक कुटुंबात फैलाव झाला आहे. सगळीकडे झाले असे नाही. नाशिक शहर, ग्रामीण, येवला देखील नियंत्रणात असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Leave a Comment