कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी धावणार 100 ‘लाल परी’


मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या जवळपास 100 बस धुळ्यातून राजस्थानमधील कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी जातील. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील दोन दिवसात होईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. परब यांनी काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

महाराष्ट्रातील दीड ते दोन हजार विद्यार्थी लॉकडाऊनमुळे राजस्थानच्या कोटामध्ये अडकले आहेत. आम्हाला परत आणण्याची व्यवस्था महाराष्ट्र सरकारने करावी, अशी मागणी ते सातत्याने करत होते. यासंदर्भात काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या विद्यार्थ्यांचा विचार करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र आणि राज्यस्थान सरकारमध्ये याबाबत सकारात्मक चर्चा झाली आणि विद्यार्थ्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. परंतु या विद्यार्थ्यांना कसे परत आणायचे असा प्रश्न होता. त्यावेळी महाराष्ट्राची लालपरी मदतीला धावून आली.

कोटा येथे महाराष्ट्रातील जी मुले अडकली होती, त्यांना परत आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबत महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या जवळपास 100 बस धुळ्यातून कोटो येथे जातील आणि त्या मुलांना पुन्हा महाराष्ट्रात घेऊन येतील. त्यानंतर त्यांना आपापल्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था केली जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाची अंमलबजावणी पुढील दोन दिवसात होईल, असे अनिल परब म्हणाले.

Leave a Comment