सोलापुरातील तीन डॉक्टर अन् एका नर्सला संसर्ग, रुग्ण संख्या ६१ वर


पुणे – रविवारी सोलापुरात अकरा नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सोलापुरात आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रूग्णांची संख्या ६१ वर पोहोचली आहेत. यात पाच मृतांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आतापर्यंत शहरामध्ये असलेला कोरोनाचा फैलाव पसरला असून सांगोला पाठोपाठ कोरोनाबाधित रूग्ण मोहोळ तालुक्यात आढळून आला आहे. रविवारी नव्याने आढळून आलेल्या कोरोनाबाधित अकरा रूग्णांमध्ये तीन डॉक्टर आणि एका नर्सचा समावेश आहे.

कोरोनाग्रस्त व मृतांच्या संख्येची अधिकृत माहिती रविवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. १२ एप्रिल रोजी शहरात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. आतापर्यंत १४ दिवसांत रूग्णांची संख्या वाढून ६१ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्याही पाच झाली आहे. सध्या ५६ रूग्णांवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात उपचार केले जात आहेत. अद्यापि कोरोना चाचणीचे १७६ अहवाल प्राप्त व्हायचे आहेत.

शास्त्रीनगरातील तीन रूग्णांचा रविवारी आढळून आलेल्या कोरोना रूग्णांमध्ये समावेश आहे. तर पाच्छा पेठ, हुतात्मा कुर्बान हुसेननगर, नई जिंदगी चौक, कर्णिकनगर, यशवंत सोसायटी, सोलापूर तालुका पोलीस ठाणेलगतचा परिसर आणि सोरेगाव एसआरपी कॅम्प परिसरात प्रत्येकी एक याप्रमाणे दहा रूग्ण नव्याने सापडले आहेत. तर एक रूग्ण मोहोळ तालुक्यातील पाटकूल गावात राहणारा आहे. शनिवारी सोलापुरमधील सांगोला तालुक्यातील घेरडी येथे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला होता. त्यापाठोपाठ मोहोळ भागातही कोरोनाचे लोण पसरल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धोका वाढला आहे.

आतापर्यंत सोलापूर शहरात पाच्छा पेठ, भारतरत्न इंदिरानगर, हुतात्मा कुर्बान हुसैननगर, शास्त्रीनगर, मोदीखाना आदी भागात दाट लोकवस्त्यांच्या झोपडपट्टी भागात कोरोनाचे बहुतांशी रूग्ण आढळून आले आहेत. यात कर्णिकनगर, नई जिंदगी, यशवंत सोसायटी व सोरेगाव या भागातही करोनाचा फैलाव झाल्यामुळे तेथील नागरिकांपुढील संकट वाढले आहे.

Leave a Comment