त्या लढवय्या शहिद पोलिसांच्या कुटुंबांना 50 लाख अन् सरकारी नोकरी : गृहमंत्री


मुंबई : फेसबुकद्वारे संवाद साधताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे मृत्यू झाला असून, महाराष्ट्र शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दोघांच्याही कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत व योग्य ती सरकारी नोकरी, तसेच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल, असे स्पष्ट केले. दोन हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदुरकर व संदीप सुर्वे यांचा कोरोनाशी झुंजताना दुर्दैवी मृत्यू फारच दुःखदायक आहे. राज्य सरकार त्यांच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे ट्विट गृहमंत्र्यांनी केले आहे.

हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदुरकर व संदीप सुर्वे यांचा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे. मृतांच्या प्रत्येक परिवाराला 50 लाखांची मदत व सरकारी नोकरी देण्याचे गृहमंत्र्यांनी जाहीर केले आहे. कोरोना संदर्भात प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसाला वा अधिकाऱ्याला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलिस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारच्या कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी यावेळी केले.

Leave a Comment