मुंबईकरांची चिंता वाढली… ! रुग्णसंख्या ५००० च्या पुढे


मुंबई – देशाच्या आर्थिक व्यवस्थेला महत्वपूर्ण हातभार लावणाऱ्या महाराष्ट्र राज्याला कोरोना व्हायरसने सर्वात जास्त ग्रासले आहे. या महामारीने शनिवारी राज्यात २२ जणांचा बळी घेतला आहे. मुंबई पोलिसातील कर्मचाऱ्याचाही यामध्ये समावेश आहे. राज्यात शनिवारी ८११ नवीन कोरोनाग्रस्त आढळल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७६२८ झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त मायानगरी मुंबईत आहेत. कोरोनाग्रस्तांची मुंबईमधील संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे.

कोरोनाबाधितांची गिरगाव, ग्रॅन्ट रोड, वरळी, भायखळा, धारावी, गोवंडी, मानखुर्द आदी विविध परिसराती संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी मुंबईमध्ये ६०२ नवीन रूग्ण आढळले तर १३ जणांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ५०५९ झाली असून आतापर्यंत १९१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ३२३ जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, विविध रुग्णालयांतील १६७ कोरोनाबाधित बरे झाले असून त्यांना शनिवारी घरी पाठवण्यात आले. कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ७६२ झाली आहे.

शनिवारी २१ नवे कोरोनाचे रुग्ण दाटीवाटीने उभ्या असलेल्या धारावी परिसरात सापडले असून धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या २४१ वर पोहोचली आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत धारावीतील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. धारावी कोळीवाडा, मुकुंद नगर, ६० फूट रस्ता, शांती शिवन सोसायटी, कुंची कर्वे नगर, इंदिरा नगर, कल्पतरू सोसायटी, कल्याणवाडी, सोशल नगर, गांधी नगर, माटुंगा लेबर कॅम्प येथे शनिवारी नवे रुग्ण आढळून आले.

तर गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका कोरोनाबाधित महिलेमुळे दोन डॉक्टरांसह एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. या डॉक्टरांवर सध्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून रुग्णालयातील १५ जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment