
मुंबई: राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राजस्थान सरकारच्या संपर्कात असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणले जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटीच्या काही विभागातील चालकांना या स्पेशल ड्युटीसाठी बोलावण्यात आल्याने त्या चालकांच्या कुटुंबाने चिंता व्यक्त केली आहे. हे विद्यार्थी कोटा येथून आणताना आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन होणार असल्याची माहिती आहे.
राजस्थानमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणणार लाल परी
कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याबाबत महाराष्ट्र सरकारने घोषणा केली होती. पण त्यांना आणणार कसे? याबाबत स्पष्टता नव्हती. पण महाराष्ट्राची लालपरी आता या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धावणार असल्याने पालकांची बऱ्याचअंशी चिंता मिटली आहे. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आता एसटीच्या साधारण 90 बसेस धावण्याची शक्यता आहे. लांबचा प्रवास असल्याने एका चालकावर ताण येऊ नये यासाठी एका बससाठी दोन चालक राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याबाबत राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार कोटा येथे असलेल्या काही विद्यार्थ्यांनी वाहनांची व्यवस्था केली होती. त्यांना प्रवासासाठी परवानगी हवी होती. ती परवानगी राज्य सरकारने मिळवून दिली आहे. त्यामुळे वाहनांची व्यवस्था असलेले काही विद्यार्थी कोटा येथून निघाले आहेत. हे विद्यार्थी थेट त्यांच्या जिल्ह्यात येतील. इतर विद्यार्थ्यांसाठी राज्यातून एसटीच्या बसेस जाणार आहेत. ह्या बसेस विद्यार्थी ज्या जिल्ह्यात आहेत तिथे त्यांना सोडणार आहेत.
दरवर्षी राजस्थानमधील कोटा येथे आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परीक्षेच्या तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी जातात. यामध्ये महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा समावेश असतो. कोटा येथे यावर्षी शिकायला गेलेल्या जवळपास दीड हजार ते दोन हजार विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला. पहिला लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत संपणार होता. त्यावेळेस या विद्यार्थ्यांना 14 एप्रिलपर्यंत येथेच राहा, मग पुढे पाहू, असे तेथील शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांना सांगितले होते. यानुसार हे विद्यार्थी तेथेच थांबले. पण लॉकडाऊन पुन्हा 3 मे पर्यंत वाढवण्यात आल्याने येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठी मागणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी चर्चा केली.
राज्याने या संदर्भांत विद्यार्थ्यांच्या स्थलांतराबाबत राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याला पत्राद्वारे कळवले आहे. कोटा येथील अडकलेल्या विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राजस्थानमधून निघून मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून प्रवास करून महाराष्ट्रात येणार आहे. या विषयी राज्याने संबंधित राज्यांना पत्राद्वारे कळवले आहे. राज्यात परतल्यानंतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.
पुढील दोन दिवसात राजस्थानच्या कोट्यातून महाराष्ट्राच्या 1800 विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आणण्याचे काम सुरु होईल. 3 तारखेच्या आत सर्व विद्यार्थ्यांना आणू, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून काल दिली होती.
