आम्ही दिलेले किट्स चांगेलच, तुम्हालाच वापर करता येत नाही, चीनच्या उलट्या बोंबा


नवी दिल्ली – देशातील अनेक राज्यांमधून चीनकडून विकत घेतलेले रॅपिड टेस्ट किट हे चुकीचे असल्याची तक्रार करण्यात येत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) यानंतर तूर्तास या किट्सचा वापर थांबवण्याचा आदेश दिला आहे. पण या रॅपिड टेस्ट किटची निर्मिती करणाऱ्या चीनमधील कंपनीने आपल्या किटमध्ये काही समस्या नसून त्यांचा चुकीच्या पद्धतीने भारतातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून वापर केला जात असल्याचा दावा करत भारतावरच खापर फोडले आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

चीनमधून भारतात एकूण पाच लाख टेस्टिंग किट आयात करण्यात आले असून हे किट चीनमधील दोन कंपन्या Wondfo Biotech आणि Livzon Diagnostics यांच्याकडून पाठवण्यात आले आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये या किटचे वाटप कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात आले होते. हे किट चुकीचे निकाल दाखवत असल्याची राजस्थान आणि पश्चिम बंगाल सरकारने माहिती दिली होती. आयसीएमआरने याची दखल घेत सर्व राज्यांना किटचा वापर थांबवण्याचा आदेश दिला. या किटचा वापर फक्त पाळत ठेवण्यासाठी केला जावा असं सांगण्यात आलं.

या किटचे आयसीएमआरकडून टेस्टिंग केले जात असून जर किट सदोष आढळले तर चीनमधील या कंपन्यांसोबतचा करार रद्द करण्यात येईल अथवा त्यांना नव्याने किट पाठवण्यास सांगण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान किटवरुन वाद निर्माण होऊ लागल्यानंतर यावर चीनमधील संबंधित कंपन्यांनी स्पष्टीकरण दिले असून आपल्या किटमध्ये कोणताही दोष नसून ते जगभरात पाठवले जात असल्याचे सांगितले आहे. त्यांनी यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना किटबद्दल दिलेल्या सूचनांनुसार योग्य रितीने वापर करावा, असा सल्लाही दिला आहे.

Leave a Comment