आता चीन नव्हे तर हा देश करणार रॅपिड टेस्ट किट्सचा पुरवठा


नवी दिल्ली : चीनने भारताला दुय्यम दर्जाचे रॅपिड टेस्ट किट दिल्यानंतर आता दक्षिण कोरियाकडून किट घेण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. ९.५ लाख कोविड किटची ऑर्डर दक्षिण कोरियाला देण्यात आली आहे. या कंपनीची सहायक कंपनी मानसेरमध्ये किट बनवण्यास सुरुवात देखील झाली आहे. चीनकडून ७ लाख कोविड रॅपिड टेस्ट किट भारताने मागवले होते. या किटची गुणवत्ता दुय्यम दर्जाची होती. देशातील अनेक राज्यातून या किटबद्दल तक्रारी येऊ लागल्यानंतर चीनला किट परत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दक्षिण कोरियातील भारतीय राजदूत श्रीप्रिया रंगनाथ यांनी कमी वेळात सर्वात योग्य किंमत आणि सर्वात चांगली गुणवत्तेत हे किट घ्यायचे असल्याचे सांगितले. भारतीय परराष्ट्र सचिव, कोरीया उप परराष्ट्र मंत्री आणि इंडो पॅसिफिक देशांतील इतर सदस्य या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक आठवड्यात नवे पाऊल उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या या किट्सचा भारतातील रुग्णालयांमध्ये तुटवडा जाणवत असल्यामुळे चीनकडून भारताने पीपीई किटस आयात केले होते. नुकतीच भारतात पीपीई किटसची पहिली बॅच पोहोचली होती. पण, यापैकी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ६३ हजार किटस ठरवून दिलेल्या निकषांत बसत नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे चीनकडून रॅपिट टेस्ट किटस आणि अन्य वैद्यकीय साधनसामुग्रीही भारताने मागवली असल्यामुळे आता त्यामध्येही दोष असल्यास देशातील आरोग्य यंत्रणांसमोर मोठा पेच उभा राहण्याची शक्यता आहे.

चीनची कोरोनासारख्या संकटाच्या काळातही इतर देशांना सदोष वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्याची ही पहिली वेळी नाही. चीनने यापूर्वी स्पेनला कोरोनाच्या चाचणीसाठी लागणारी किटस् विकली होती. पण, या किटसमध्ये त्रुटी असल्यामुळे स्पेनमध्ये कोरोना व्हायरस वेगाने पसरला होता. यानंतर स्पेनने ५० हजार दोषपूर्ण किटस् पुन्हा चीनला पाठवून दिली होती. चीनने नेदरलँडसला पाठवलेले मास्कही असेच बनावट असल्याचे आढळून आले होते. संबंधित देशांनी याविषयी जाब विचारल्यानंतर चीनने आपली चूक मान्य करण्यास नकार दिला होता.

Leave a Comment