महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी ! राज्यात केलेल्या कोरोना चाचण्यांपैकी जवळपास 94 टक्के निगेटिव्ह


मुंबई : दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 21 एप्रिलपर्यंत झालेल्या एकूण कोरोना चाचण्यांपैकी जवळपास 94 टक्के चाचण्या काल निगेटिव्ह आल्या आहेत. ही बाब सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. 9 मार्च रोजी राज्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढले असून आता राज्यात दररोज 7 हजारपेक्षाही अधिक चाचण्या घेण्यात येत आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 96 हजार 369 नमुन्यांपैकी 89 हजार 561 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर 6427 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 14 हजार 398 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 8702 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. मुंबई-पुण्यासह राज्यात रुग्णांची संख्या वाढत असताना या अहवालातील हे निष्कर्ष काहीसे दिलासादायक ठरत असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या 778 नवीन रुग्णांची राज्यात काल नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6427 झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी सहा जण मुंबईचे तर पुण्याचे पाच तर नवी मुंबई, नंदूरबार आणि धुळे मनपा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू आहे. राज्यात आतापर्यंत 283 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 840 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

Leave a Comment