चीनमध्ये कोरोनाची वापसी; हार्बिन शहरात आढळले 70हून अधिक रूग्ण


बीजिंग : कोरोनाची चीनमध्ये पुन्हा एकदा वापसी झाली आहे. पण यावेळी कोरोनाने वुहान शहरात नव्हे तर हार्बिन शहरात आपले बस्तान बसवले आहे. चीनची राजधानी बीजिंगपासून 1 हजार 240 किलोमीटर दूर असलेल्या हार्बिन शहरामध्ये 70 लोकांना कोरोनाची बाध झाली आहे.

चीनमधील हेलॉन्गजियांग प्रांताची हार्बिन ही राजधानी आहे. एक कोटीच्या जवळपास येथील लोकसंख्या आहे. 53 हजार 523 वर्ग किलोमीटर परिसरात वसलेल्या या मोठ्या शहरात 131 जिल्हे, 107 तालुके, 62 टाऊनशिप आणि 1 हजार 879 गावे आहेत. आकाराने हार्बिन भारताच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या दिल्लीहून 36 पटीनी मोठे आहे. या शहरात 70 रूग्ण समोर आल्यानंतर चीन शहर लॉकडाऊन केले आहे.

हार्बिनमधील ज्या 70 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या नातेवाईकांवर नजर ठेवण्यात येत आहे. कॉन्टेक्ट ट्रेसिंगसाठी शेकडो लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. हार्बिनमध्ये फक्त त्याच लोकांना बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्यांनी कोरोना अॅप आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल केले आहे आणि ज्यांना कोरोनाची बाधा झालेली नाही.

इतर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, चीनमधील अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, कोरोना हार्बिनमध्ये पसरण्यामागील सर्वात मोठे कारण न्यूयॉर्कमधून परतलेला एक विद्यार्थी असून कोरोनाची या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे दिसून आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या आणि आजूबाजूच्या 4 हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यावेळी त्यातील 70 लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

देशात फक्त कोरोनाचे दोन रूग्ण असल्याचा दावा चीन सरकार करत असतानाच हार्बिन शहरातील 70 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. चीन सरकारने हादेखील दावा केला आहे की, मागील आठ दिवसांपासून कोरोना व्हायरसमुळे कोणचाही मृत्यू झालेला नाही. आता हार्बिनमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातमीने चीन सरकार करत असलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Leave a Comment