यंदा केदारनाथ पालखी वाहनातून मंदिर मुक्कामी जाणार


फोटो साभार झी न्यूज
देशातील प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगातील ११ वे अर्धे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे प्रथेप्रमाणे २९ एप्रिल रोजी उघडले जात असून केदारनाथाची पालखी यंदा वाहनातून शीतकालीन गादीस्थळावरून मूळ मंदिरात नेली जाणार आहे. यंदा केदार आणि बद्रीच्या मंदिर उघडण्याच्या तारखा प्रथम पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली गेली होती मात्र नंतर निर्णय बदलून ही मंदिरे नेहमीच्या तिथीला उघडली जातील अशी घोषणा केली गेली आहे.

दर वर्षीच्या प्रथेप्रमाणे उखी मठ येथे हिवाळा काळात केदारनाथाची मूर्ती आणली जाते आणि नंतर अक्षयतृतीयेनंतर मूळ मंदिरात पालखीतून मूर्ती नेली जाते. यावेळी पालखीचे दोन मुक्काम होतात. उखी मठापासून पालखी निघताना प्रचंड संखेने भाविक दर्शनासाठी लोटतात. मात्र यंदा करोना मुळे भाविकांना दर्शन घेता येणार नाही आणि पालखी वाहनातून थेट केदारच्या पायथ्याशी असलेल्या गौरी कुंड येथे नेली जाणार आहे. पालखी सोबत मोजके १६ जण असतील असे समजते. २९ एप्रिलला पहाटे ६ वा.१० मिनिटांनी मंदिर उघडले जाणार आहे.

पालखी वाहनातून नेण्याची यात्रेच्या इतिहासात ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी १९७७ साली आणीबाणी लागू झाली तेव्हा केदार मंदिर बंद करताना हिवाळ्यात पालखी वाहनातून उखी मठ येथे आणली गेली होती आणि मंदिर उघडताना पुन्हा वाहनातूनच मंदिरात नेली गेली होती.

Leave a Comment