मुंबई, पुण्यातील सरकारी कार्यालयात पुन्हा ५ टक्के उपस्थिती


मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होतच आहे. त्यातच मुंबई आणि पुणे या महत्वाच्या शहरांमधील कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी चिंतेचा विषय बनत असल्यामुळेच मुंबई, पुण्यात शासकीय कार्यालयातील उपस्थिती पुन्हा ५ टक्क्यांवर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. धुळ्यात ७, मालेगावांत ५, जालन्यात १ रुग्ण नव्याने आढळले तर नंदुरबारमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. तर जळगावतही एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

राज्य सरकारने मुंबई परिसर आणि पुणे परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या भागातील शासकीय कार्यालयातील उपस्थिती पुन्हा पाच टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर २० एप्रिलपासून शासकीय कार्यालयातील उपस्थिती १० टक्के करण्यात आली होती. पण मुंबई एमएमआर विभाग आणि पुणे पीएमआर विभागातील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या भागातील शासकीय कार्यालयातील उपस्थिती पुन्हा पाच टक्क्यांवर आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज सकाळपासून १३ रुग्ण नव्याने आढळले आहेत. यात धुळ्यात आज सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सात पैकी सहा रुग्ण धुळे शहरातील तर एक रुग्ण शिरपूरमधला आहे. तर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावातही आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मालेगावात एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या आकड्य़ाने शंभरी पार केली केली. जालन्यातही एक कोरोना रुग्ण आढळला आहे. दुःखी नगर मध्ये एका ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तर आज कोरोनामुळे दोन जणांचा बळी गेला आहे.

नंदुरबारमध्ये कोरोनामुळे पहिला बळी गेला आहे तर जळगावातील मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. अमळनेर येथील ७३ वर्षीय व्यक्ती टीबी रोगाने ग्रस्त होती. त्याच्यात कोरोनाची लक्षण आढळल्याने त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते, अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या वृद्धाचा मृत्यू २० एप्रिलला झाला होता.

Leave a Comment