आजपासून अंशतः सुरु होणार ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योग !


मुंबई : आज म्हणजे 20 एप्रिलपासून राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योग अंशत: सुरु होणार आहेत. अटीशर्तींसह तेथील उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईतीलही काही कामांना परवानगी देण्यात येणार आहे. सरकारकडून शहरातील कंटेनमेंट झोन वगळता बांधकाम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सर्व उद्योग धंद्यांना सोशल डिस्टन्सिंग विषयक नियमांसह अन्य बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे. यात कर्मचाऱ्यांच्या राहण्याची तसेच दैनंदिन गरजांची व्यवस्था बांधकाम ठिकाणीच करणे बंधनकारक असणार आहे. अटींचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येणार आहे.

काल (19 एप्रिल) दुपारी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यांनी यावेळी काही ठिकाणी उद्योगांना अशंत: परवानगी देत असल्याचे सांगितले. कोरोनामुळे देशासह राज्याची अर्थव्यवस्था चिखलात रुतली आहे. अर्थचक्र फिरले पाहिजे म्हणून काही ठिकाणी मोजक्या स्वरुपात उद्योगधंद्यांना परवानगी देत आहोत. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना माफक स्वरुपात परवानगी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

काही जिल्हे शून्य रुग्णाचे असून काही ठिकाणी घट झाली आहे. रेड झोन, ऑरेंज , ग्रीन असे झोन केले असल्यामुळे अशा काही निवडक ठिकाणी आम्ही माफक स्वरुपात उद्योगांना परवानगी देत आहोत. जर तुम्ही तुमच्या मजुरांची काळजी घेत असाल, त्यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था करत असाल तर मान्यता मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी वगळून काही भागात सर्व क्षेत्रातील उद्योगांना काही अटी आणि शर्तींवर आजपासून परवानगी देण्यात आली आहे. त्या अटींनुसार ज्या ठिकाणी कंपनी आहे, त्याच ठिकाणचे कामगार असतील किंवा कंपनीच्या कॉलनी, गेस्ट हाऊसमध्ये राहणारे कामगार असतील, त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. इतर शहरातून अथवा ठिकाणाहून कामगारांची ने-आण करण्यास परवानगी दिली जाणार नाही. कामाच्या ठिकाणीदेखील पुरेशी काळजी घेऊन आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवून काम करण्याचे बंधन आहे.

मुंबईतील हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणी काही कामांना अटीशर्तीसह परवानगी देण्यात येणार असून त्या अटीनुसार मुंबई महापालिका क्षेत्रातील ‘कंटेनमेंट झोन’ वगळून प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्यास अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. अटींचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे आढळल्यास परवानगी तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. बांधकाम ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या राहण्याची, स्वच्छतेची तसेच इतर आवश्यक गरजांची व्यवस्था ही त्याच ठिकाणी करणे बंधनकारक आहे. बांधकाम ठिकाणी काम करत असणाऱ्या कामगारांना अन्नधान्य व पाण्यासह त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू सदर ठिकाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती वैद्यकीय तपासणी नियमितपणे करुन घेणे. तसेच त्या अनुषंगाने आवश्यकता भासल्यास आवश्यक ते औषधोपचार करणे. बांधकाम ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्वांनीच ‘सोशल डिस्टन्सिंग’चे काटेकोरपणे पालन करण्यासह मास्क नियमितपणे वापरणे बंधनकारक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment