मुंबईतील पत्रकार देखील झाले कोरोनाबाधित


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढत होत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या सेवेत असणाऱ्या पोलिस, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर आता पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे.

पत्रकार संघाने गेल्या आठवड्यात मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या करोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित केला होता. १६८ जणांची त्यामध्ये कोरोना चाचणी घेण्यात आली. रविवारी मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार त्यातील ५३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी बहुतांश पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियातील असल्याचे वृत्त आहे.


यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी दिलेल्या माहितीनुसार १६८ पत्रकारांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ५३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेला टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा ३० पेक्षा जास्त पत्रकारांना संसर्ग झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन आणि मंत्रालयातील पत्रकार संघाच्या विनंतीनंतर पत्रकांराच्या कोरोना चाचणीसाठी महापालिकेला विशेष कॅम्प आयोजित करण्यास सांगितले होते. कोरोनाची कोणतीही लक्षणे कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये बर्‍याच जणांना नव्हती. काही पत्रकारांच्या चाचणीचा अहवाल अद्याप येणे बाकी असल्यामुळे या संख्येत आणखीही वाढ होऊ शकते, असे देखील सांगितले जात आहे.

१६ आणि १७ एप्रिल रोजी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या देखरेखीखाली पत्रकार आणि कॅमेरामॅनच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. या कॅम्पचे आयोजन मुंबई प्रेस क्लबजवळ करण्यात आले होते. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पत्रकार आणि कॅमेरामॅन यांना सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा, तसेच हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनेटायझर्सचा वापर करावा, अशा सूचना त्यावेळी देण्यात आल्या होत्या.

Leave a Comment