युट्यूबवर भाईजानचे पदार्पण, गाण्याच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती


देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे देशातील लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 मेपर्यंत वाढवला आहे. या दरम्यान सिनसृष्टीत सुरु असलेल्या चित्रपटांचे आणि मालिकांचे चित्रिकरण देखील थांबवण्यात आलेले आहे. सध्याच्या घडीला सर्वच बॉलीवूड सेलिब्रेटी हे आपापल्या घरात असून ते सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत आहेत. बॉलीवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खान देखील सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय झाला असून या माध्यमातून आपल्या अंदाजात कोरोनाविषयी जनजागृती करत आहे. त्याने आता तर कोरोना व्हायरसवर चक्क एक गाणे बनवले असून हे गाणे नुकतेच चाहत्यांच्या भेटीला आले आहे.


सोशल मीडिया आणि सर्व म्युझिक प्लॅटफॉर्मवर सलमानने आपल्या आवाजातील हे गाणे रिलीज केले आहे. या गाण्याचे बोल प्यार करोना असे असून सलमान खानने थोड्याच वेळापूर्वी संपूर्ण गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे सलमान खान आणि हुसैन दलाल यांनी मिळून हे गाणे लिहिले आहे, तर गाण्याला साजिद-वाजिद यांनी संगीत दिले आहे. सलमानने हे गाणे ‘इमोशनली पास और फिजिकली दूर रहो ना, प्यार करोना, असे कॅप्शन देत पोस्ट केले आहे.

सलमान खानने आपल्या चाहत्यांना या गाण्याच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये घरी काय काय करता येऊ शकते तसेच आपला वेळ अधिक खास कसा बनवू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याव्यतिरिक्त, त्याने आपल्या चाहत्यांना कुटुंबासमवेत वेळ घालण्याचा सल्लाही दिला आहे.

Leave a Comment