मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला


मुंबई : गेल्या 24 तासांत महानगरी मुंबईतील वाढणाऱ्या रुग्णसंख्येचा वेग काल सलग तिसऱ्या दिवशी मंदावल्याचे दिसून आले आहे. पण या घटणाऱ्या रुग्णसंख्या वाढीच्या वेगावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही रुग्णसंख्यावाढीच्या वेगातली ही कृत्रिम घट तर ठरणार नाही ना, अशी शक्यता व्यक्त केली. चाचणी करण्याचे निकष बदलल्याने रुग्णसंख्या वाढीत घट होईल पण ती कृत्रिम घट असेल असे फडणवीसांनी म्हटले आहे.

कोरोना चाचणी पद्धतीत मुंबई महापालिकेकडून महत्वाची सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार, लक्षणे नसलेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींची कोरोना चाचणी न करता त्यांना क्वॉरंटाईन करुन पाच दिवसांनंतर त्यांची चाचणी केली जाईल, असे सांगितले. अशा गटातील व्यक्तींची यापूर्वी वैद्यकीय चाचणी विलगीकरणानंतर लगेचच करण्यात येत होती. पण या पद्धतीत नव्याने सुधारणा करण्यात आली असून या गटातील व्यक्तींची विलगीकरणातील 5 दिवसानंतर वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.

हाय रिस्क कॉन्टॅक्ट लक्षणे नसलेल्यांच्या कोरोना चाचण्या फॉल्स निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे विलगीकरणानंतर अशा व्यक्तींची किमान 5 दिवसांत चाचणी केली जाईल. फॉल्स निगेटिव्ह केस म्हणजे जे वस्तुतः बाधित आहेत, परंतु त्यांची वैद्यकीय चाचणी मात्र ‘निगेटिव्ह’ येत आहे; अशा चाचण्यांना वैद्यकीय परिभाषेत ‘फॉल्स निगेटिव्ह टेस्ट’ असे संबोधले जाते.

हाय रिस्कमधील लक्षणे नसलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करून त्यांच्यावर लक्ष ठेवले. एखाद्यामध्ये जर लक्षणे दिसली तर मग त्याची टेस्ट होणार आहे. हाय रिस्कमधील सरसकट सर्वांची यापूर्वी कोविड-19 ची चाचणी केली जात होती. यामध्ये बहुतांश जणांची टेस्ट पॉजिटिव्ह येत असे, परंतु त्यांना कुठलीही लक्षणे दिसून येत नसल्यामुळे ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे, पण लक्षणे दिसत नसल्याने त्यांची टेस्टच होणार नसल्याने रूग्णांची संख्या आपोआपच कमी होण्याची देखील शक्यता आहे. परंतु यामुळे हाय रिस्कमधील व्यक्तींचे व्यवस्थीत क्वारंटाईन न झाल्यास धोका निर्माण होवू शकतो.

राज्यात सध्या एकूण रूग्णांपैकी 80 टक्के रूग्णांमध्ये लक्षणे नाहीत. तर 18 टक्के रूग्णांमध्ये लक्षणे आहेत, तर 2 टक्के रूग्ण क्रिटीकल आहेत. कोरोना पॉजिटिव्ह आहेत परंतु लक्षणे दिसत नसलेल्यांना वैद्यकीय उपचारांची गरज नसल्यामुळे लक्षणे असलेल्यांच्या अधिकाधिक टेस्ट करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. यामुळे लक्षणे असलेल्या आणि गंभीर आरोग्य स्थितीत असलेल्या कोरोना पॉजिटिव्ह रूग्णांना वैद्यकीय सुविधा प्राधान्याने मिळतील.

13 एप्रिल 2020 पर्यंत मुंबईत तब्बल 27 हजार 397 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर देशात याच तारखेपर्यंत एकूण 2 लाख 17 हजार 554 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. याचाच अर्थ देशातील एकूण चाचण्यांच्या 12.59 टक्के एवढ्या वैद्यकीय चाचण्या या केवळ मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment