एका चोरामुळे पोलीस, न्यायाधीश आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांना व्हावे लागले क्वारंटाइन


लुधियाना – पंजाबमध्ये अटक करण्यात आलेल्या चोराला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तेथील १७ पोलीस कर्मचाऱ्यांना चक्क क्वारंटाइन करण्यात आले आहे. या सर्वांना लुधियानामध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. या चोरामुळे फक्त पोलीस कर्मचारीच नव्हेतर न्यायाधीश आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांना देखील क्वारंटाइनमध्ये राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

वाहनांची चोरी करणाऱ्या २५ वर्षीय सौरव सेहगल या चोराला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात ५ एप्रिल रोजी हजर केले होते. त्याला जीवन नगर पोलीस ठाण्यात एका दिवसासाठी बंदिस्तही ठेवण्यात आले होते. दोन स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी चोराला अटक केली होती. पण तो चोर कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न होताच त्याच्या कुटुंबातील ११ जणांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

सौरव सेहगलला ताप आणि खोकला असल्याचे ६ एप्रिल रोजी न्यायाधीशांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना त्यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिला. सौरव सेहगल आणि त्याच्या साथीदाराची पोलिसांनी न्यायालयीन कोठडीत पाठवण्याआधी वैद्यकीय तपासणी करुन घेतली. सौरव त्यावेळी कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायाधीश आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांना स्वविलगीकरणात जाण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान सौरवचा साथीदार नवज्योत सिंहने रुग्णालयात नेत असताना पळ काढला. त्याचा सोनसाखळी चोरी प्रकरणांमध्ये सहभाग होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव आजारी वाटत होता, पण नवज्योतची प्रकृती चांगली होती. पण सौरवच्या संपर्कात आल्याने त्यालाही कोरोनाची लागण झाल्याची भीती असून पोलीस शोध घेत आहेत.

चोराच्या संपर्कात दहा पोलीस कर्मचारी आले होते ज्यामध्ये तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, दोन हेड कॉन्स्टेबल आणि दोन होम गार्ड यांचा समावेश आहे. प्रेस नोटसाठी फोटो काढण्यासाठी दोन्ही चोरांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. यावेळी त्यांचा संपर्क पोलीस निरीक्षक मोहम्मद जमील आणि हेड कॉन्स्टेबलसोबत आला. चोराला न्यायालय आणि रुग्णालयात नेताना तीन पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत होते. यामध्ये दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि एक होम गार्ड होता. तसंच फिंगरप्रिंट घेत असताना दोन कॉन्स्टेबल त्याच्या संपर्कात आले. यामध्ये एक महिला पोलीस कर्मचारी आहे.

Leave a Comment