अत्यावश्यक सेवेतील एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता


मुंबई – जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव आता भारतातही झपाट्याने वाढत आहे. देशात महाराष्ट्रातील कोरानाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असून राज्य व केंद्र शासनाकडून या पार्श्वभूमीवर कोरोनाला संपवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देशभरात 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. पण या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू असून आता या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे.

देशपातळीसह राज्यपातळीवर अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, परिचारिक, सफाई कामगार, औषध विक्रेते, पोलीस आणि शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह एसटीचे कर्मचारी देखील या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना दररोज 300 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.

याबाबत माहिती देताना परब म्हणाले, लॉकडाउनची देशभरात घोषणा करण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार या काळात बंद आहेत. मुंबईसारख्या महानगरात अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दळणवळणाची सेवा पुरवण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर सोपवली आहे. एसटीचे कर्मचारी यशस्वीपणे ही जबाबदारी पार पाडत आहेत. एसटीचे सर्व कर्मचारी रोज आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करत आहेत. केवळ मुंबईतीलच नाही तर ठाणे, पालघर, रायगड अशा विविध विभागातून एसटी कर्मचारी सध्या मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी कार्यरत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे मुंबईत घर नाही, त्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था एसटी महामंडळामार्फत करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना कामावर जाताना मास्क व सॅनिटरी लिक्विडची बाटली दिली जात आहे. एसटी प्रशासनामार्फत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जात असल्याचेही परब म्हणाले.

Leave a Comment