सोलापूरातील अतिउत्साही तरुणांनी लावले दिवे, विमानतळ परिसरात आग


सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशभरातील जनतेला रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील लाईट घालवून दिवे अथवा मेणबत्ती पेटवण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या आवाहनाला पाठिंबा म्हणून सोलापुरात काही अतिउत्साही तरुणांनी फटाके फोडले. विमानतळ परिसरात या फटाक्यांच्या ठिणग्या पडल्याने रविवारी रात्री मोठी आग लागली. मोठ्या प्रयत्नांनी अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु दिवा लावण्याऐवजी फटाके फोडण्याचा अतिउत्साह मात्र येथे पाहायला मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना कोरोना व्हायरसविरोधातील लढ्यासाठी एकजूट दाखवण्यासाठी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घरातील लाईट बंद करुन घरात, अंगणात, गॅलरीमध्ये किंवा रस्त्यावर दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावण्याचे आवाहन केले. नागरिकांनीही या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पण याचवेळी काही जणांनी अतिउत्साह दाखवत, मशाली पेटवल्या रस्त्यावर रॅली काढले, फटाके फोडले. असाच प्रकार सोलापुरात घडला.

काल रात्री मागील काही वर्षांपासून बंद असलेल्या सोलापूर विमानतळाच्या परिसरात मोठी लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही अतिउत्साही तरुणांनी सोलापूर विमानतळाजवळच्या परिसरातील फटाके फोडले. याच फटाक्यांच्या ठिणग्या विमानतळ परिसरात पडल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. विमानतळ बंद असल्याने परिसरात मोठ्याप्रमाणात वाळलेले गवत असल्यामुळे ही आग पसरत गेली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळच्या आटोकाट प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

Leave a Comment