सर्वेक्षण : सोशल मीडियावर कोरोना संदर्भातील 80% माहिती खोटी

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, या व्हायरसचे नाव ऐकले तरी लोकांच्या मनात भिती निर्माण होते. याच पार्श्वभुमीवर सोशल मीडियावर कोरोना व्हायरस संदर्भात मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्या आहेत.

एका सर्वेक्षणानुसार, सोशल मीडियावर कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती अथवा बातम्या 50 ते 80 टक्के खोट्या आहेत. हे सर्वेक्षण नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या जनसंचार विभागाने 28 मार्च ते 4 एप्रिल या काळात करण्यात आले आहे. सर्वेक्षणात विद्यार्थी, सरकारी आणि खाजगी कर्मचारी, व्यावसायिक आणि होम-मेकर्सचा समावेश होता.

जनसंचार विभागाचे प्रमुख डॉ. मोइज मन्नान हक म्हणाले की, खोट्या बातम्यांसंबंधी प्रश्नांवर 39.1 टक्के लोकांनी म्हटले की सोशल मीडियावर 50 ते 80 टक्के माहिती खोटी असते. तर जवळपास 10.8 टक्के लोकांच्या मते सोशल मीडियावरील 80 टक्क्यांपेक्षा अधिक माहिती खोटी असते.

याद्वारे लक्षात येते की लोकांना फेक बातम्यांविषयी माहिती आहे. मात्र असे असले तरी अनेकांच्या मते त्यांना सोशल मीडियाद्वारेच सूचना मिळतात. लॉकडाऊनच्या काळात डिजियल न्यूज मीडियाचा वापर 5.8 टक्क्यांनी वाढला आहे आणि बातम्या पाहण्यांसाठी टिव्ही पाहणाऱ्यांची संख्या 8 टक्क्यांनी वाढली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये लोकांना वृत्तपत्र मिळत नाहीत, त्यामुळे लोक ई-पेपर वाचत आहेत.

Leave a Comment