फिलिपिन्समध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्याला घातल्या गोळ्या !


डेल नॉर्टे (फिलिपिन्स) : फिलिपिन्समध्ये पोलिसांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या एका 63 वर्षीय व्यक्तीला गोळ्या घालून ठार केल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीला चेकपॉईंटवर पोलिसांनी रोखल्यानंतर त्याने धमकी दिली त्याचबरोबर पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला देखील केला. परिणामी त्याच्यावर पोलिसांनी गोळ्या झाडल्याने त्याचा मृत्यू झाला.

कोरोना व्हायरसमुळे सध्या फिलिपिन्समध्ये देखील लॉकडाऊन आहे. तेथील सरकारने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो डुटेर्ट यांनी सैन्य आणि पोलिसांना लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्याला गोळ्या घाला, असा आदेश दिला आहे.

लॉकडाऊन दरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेला हा आरोपी हातात विळा घेऊन खुलेआम फिरत होता. अगुसानच्या डेल नॉर्टे प्रांतातील नासीपिट शहरात एका चेकपॉईंटवर रोखले असता, तो शिवीगाळ करु लागला. मास्क न घातल्याने तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला विचारणा केली असता, त्याने रागाने कर्मचाऱ्यावर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या.

लॉकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीनंतरचे फिलिपिन्समधील हे पहिले प्रकरण आहे, ज्यात उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांनी गोळीबार केला. फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो डुटेर्टे यांनी काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती की, ते सैन्य आणि पोलिसांना अधिकार देत आहेत की, लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना गोळ्या घाला.

फिलिपिन्समधील परिस्थिती कोरोना व्हायरसमुळे दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. आतापर्यंत तीन हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली असून 150 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे, जेणेकरुन कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखत होईल. त्यामुळे राष्ट्रपती रॉड्रिगो डुटेर्ट यांनी जनतेला लॉकडाऊनचे गांभीर्याने पालन करण्याचे आवाहन केले आहे. सोबतच जर कोणी लॉकडाऊनचे उल्लंघन केले आणि त्यामुळे जीवाला धोका उद्भवला तर सैन्य आणि पोलीस गोळी झाडण्यास स्वतंत्र असल्याचा आदेश दिला. त्यात लॉकडाऊनच्या काळात एखाद्याला गोळी झाडण्याची हे पहिलेच प्रकरण समोर आले आहे.

Leave a Comment