कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आढळले 6 नवे कोरोनाग्रस्त


डोंबिवली : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होतच असून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहे. तर मुंबई नजिकच्या परिसरातही रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. आज डोंबिवली आणि कल्याण परिसरात 6 नवे रुग्ण आढळून आले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आणखी नव्या 6 रुग्णांची आज भर पडली आहे. डोंबिवलीमध्ये 4 रुग्ण आढळले आहे तर कल्याण परिसरात 2 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेंटमेंट प्लॅनप्रमाणे महापालिकेचे 154 आरोग्य पथकामार्फत 14 दिवस सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

रविवारपर्यंत कल्याण डोंबिवली परिसरात 28 रुग्ण आढळले होते. तर आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच एका लग्न सोहळ्यात कोरोनाबाधित तरुणाने हजेरी लावली होती. त्याच्यामुळे अनेकांनी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

दरम्यान महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरु असून नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरीत महापालिकेच्‍या रूग्‍णालयाशी संपर्क साधावा, महापालिकेच्या आरोग्य पथकास सहकार्य करावे, तसेच अधिक माहितीकरीता रूक्‍मिणीबाई रूग्‍णालय, कल्‍याण येथील 0251- 2310700 व शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय, डोंबिवली येथील 0251- 2481073 व 0251- 2495338 या हेल्‍पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहनही महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Comment