कौतुकास्पद, कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी मराठमोळे पंतप्रधान पुन्हा झाले डॉक्टर


डबलिन : कोरोना व्हायरसने जगभरातील बहुतांश देशांमध्ये थैमान घातले आहे. प्रत्येक देश या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. पण अशातच आयर्लंडचे पंतप्रधान आणि मूळ मराठी वंशाचे असणारे लिओ वराडकर यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. लिओ वराडकर कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या डॉक्टरी पेशात आले आहेत.

कोरोना संसर्ग झालेल्या आयर्लंडमधील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून तिथे कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजाराच्या वर गेली आहे. लिओ वराडकर यांनी या पार्श्वभूमीवर कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी पुन्हा एकदा डॉक्टरांच्या पेशात रजिस्ट्रेशन केले आहे. पुढील एक आठवडा वराडकर हे कोरोनाग्रस्तांचे उपचार करणार आहेत.

सध्या आयर्लंडचे पंतप्रधान असलेल्या लिओ वराडकर यांनी 7 वर्ष डॉक्टर म्हणून काम केले आहे. राजकारणात येण्याआधी ते डबलिन येथील सेंट जेम्स रुग्णालय आणि कोनोली रुग्णालयात ज्युनिअर डॉक्टर म्हणून काम करत होते. पण त्यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड या गावचे लिओ वराडकर हे रहिवासी आहे. ते 2017 मध्ये आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. लिओ यांचे वडील अशोक वराडकर 1960 साली भारतातून इंग्लंडला गेले आणि ते तिथेच स्थायिक झाले. त्यांनी तिथे आयरिश नागरिक असलेल्या मरियमशी लग्न केले. लिओ यांचा जन्म हा आयर्लंडचा असला तरी त्यांचे मुळगाव हे वराड आहे. वराड गावात त्यांचे घर आहे. आयर्लंड वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपदही वराडकर यांनी भूषवले. तसेच ते आरोग्य मंत्री होते. 2017 मध्ये ते सिमोन केव्हीने यांना पराभूत करून पंतप्रधानपदी विराजमान झाले आहे.

Leave a Comment