मागील 24 तासात देशात कोरोनाने घेतले 12 बळी, तर 336 नव्या रुग्णांची वाढ


नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा देशाला असलेला धोका आणखी वाढला असून कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 12 मृत्यू झाले आहेत, तर 336 नवे कोरोनाग्रस्त दाखल झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी शुक्रवारी दिली. देशात सध्या कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 56 झाली आहे.

दिल्लीच्या निजामुद्दीन येथे झालेला तबलिगी मरकज देशभरात कोरोना व्हायरसचे प्रमुख केंद्र ठरले आहे. देशभर हा संसर्ग घेऊन या संमेलनात सहभागी झालेले अनुयायी तिथून गेले आणि आता अनेक राज्यांमधून या तबलिगी अनुयायांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 14 राज्यांमध्ये तबलिगी जमातशी संबंधित 647 कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. हा आकडा गेल्या दोन दिवसांचा आहे. या नव्या कोरोनाग्रस्तांमुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्याही झपाट्याने वाढली आहे.

कालपासून 336 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडल्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2639 झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 56 मृत्यू देशभरात झाले आहेत. त्यातील 12 गेल्या 24 तासांतील आहेत. 157 कोरोनाग्रस्त आतापर्यंत रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. महाराष्ट्रात कोरोनाबळींची संख्या आणि कोरोनाग्रस्तांचा आकडा सर्वाधिक आहे.

Leave a Comment