अजित दोवाल यांनी पुन्हा एकदा एका रात्रीत फत्ते केले मिशन


नवी दिल्ली – दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या विनंतीकडे दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजचे प्रमुख मौलाना साद यांनी दुर्लक्ष करत बंगलेवाली मशीद रिकामी करण्यास जेव्हा नकार दिला तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना तात्काळ तिथे पोहोचून तोडगा काढण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितानुसार, २८-२९ मार्च रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अजित दोवाल मरकजमध्ये पोहोचले. त्यांनी यावेळी मौलाना साद यांची मनधरणी करत मशिदीमधील सर्वांची कोरोना चाचणी करण्यासाठी आणि क्वारंटाइन करण्यासाठी तयार केले.

तेलंगणमधील करिमनगर येथील आठ जण सुरक्षा यंत्रणांना कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर अमित शहा आणि अजित दोवाल यांना निजामुद्दीन येथील परिस्थितीची कल्पना आली होती. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी दुसऱ्याच दिवशी सर्व राज्यांच्या पोलिसांना यासंबंधी अलर्ट पाठवला होता. अजित डोवाल यांनी मध्यस्थी केल्यानंतर मरकजकडून १६७ तबलिगी कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली. गेल्या काही वर्षांमध्ये अजित डोवाल यांनी अनेक देश आणि विदेशातील अनेक मुस्लीम संघटनांशी चांगले संबंध निर्माण केले आहेत. अजित डोवाल देशाचे धोरण ठरवताना अनेकदा या संघटनांशी चर्चाही करतात.

Leave a Comment