डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन या आणि दारू मिळवा; तळीरामांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा


नवी दिल्ली – केरळमधील परिस्थिती कोरोनामुळे गंभीर होत असतानाच हे राज्य गेल्या काही दिवसांपासून केरळ वेगळ्याच घटनांमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसात केरळमध्ये लॉकडाउनमुळे दारूची दुकाने बंद असल्याने तेथील तळीरामांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन लॉकडाऊनच्या काळात ज्यांच्याकडे असेल त्यांना दारू देण्यात यावी, असे निर्देश उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. या काळात जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता सर्व वस्तूंची दुकाने ही बंद राहणार आहे. केरळमधील तळीरामांची केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे चांगलीच कोंडी झाली. सगळीकडे दारुची दुकानं बंद असल्यामुळे, गेल्या ५ दिवसांमध्ये ५ तळीरामांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.

केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी राज्यातील विविध भागात तळीरामांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन दारूचं व्यसन जडलेल्यांना दारू देण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन ज्यांच्याकडे असेल अशा तळीरामांना दारू विक्री करण्याचे आदेश मुख्यमंत्री विजयन यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर दारूच्या आहारी गेलेल्यांना मोफत उपचार करण्यात यावे असेही म्हटले आहे. विशेष बाब म्हणजे दारूच्या टंचाईमुळे काही नवीन सामाजिक प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सरकार ऑनलाईन दारू विक्रीच्या पर्यायाचा विचार करत आहे, असेही विजयन यांनी सांगितले. शनिवारी केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यातील दोन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

Leave a Comment