हे नामवंत खेळाडू करोना विरुद्धच्या लढाईत करताहेत पोलीस ड्युटी


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन मध्ये असताना क्रीडा क्षेत्रात आपले बाहुबल सिद्ध केलेले राष्ट्रीय खेळाडू त्यांची या काळातील पोलीस ड्युटी अतिशय जबाबदारीने पार पाडताना दिसत आहेत. रस्त्यावर उतरून हे पोलीस लोकांना घरातून बाहेर पडू नका हे समजावण्याबरोबर त्यांना गरजेच्या आवश्यक वस्तू मिळतील याचीही काळजी घेत आहेत.

टी २० विश्वकप विजेत्या टीम मधील गोलंदाज जोगिंदर शर्मा, भारतीय हॉकी टीमचा माजी कप्तान राजपाल सिंह, राष्ट्रमंडळ क्रीडा सुवर्णपदक विजेता मुष्टीयोद्धा अखिल कुमार आणि आशियाई खेळ चँपियनशिप कब्बडी खेळाडू अजय ठाकूर अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व खेळाडू आता पूर्णवेळ पोलीस अधिकारी आहेत आणि त्याच्या खेळामुळेच त्यांना पोलीस विभागात नोकरी मिळाली आहे.


मोहाली येथे डीएसपी पदावर असलेले राजपाल सांगतात त्यांचे मुख्य काम लॉकडाऊन काळात लोकांनी घराबाहेर पडू नये याची दक्षता घेणे तसेच गरजूना आवश्यक साधनसामग्री पुरविणे हेच आहे. या निमित्ताने नागरिकांना पोलिसाचा माणुसकीचा चेहरा पाहायला मिळतो आहे असे त्यांना वाटते. २००७ च्या टी २० वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध शेवटची ओव्हर टाकून भारताला विजयी करण्यात महत्वाची भूमिका बजावलेले जोगिंदर हरियाना पोलीस मध्ये डीएसपी आहेत. त्यांच्या मते पोलीस ड्युटीमधले हे वेगळेच आव्हान असून कोविड १९ बद्दल जागृती, औषधोपचार आणि लोकांना बंद पालन करण्यास प्रवृत्त करण्याची कामे ते करत आहेत.

गुरुग्राम पोलिसात एसीपी असेलेले २००६ च्या राष्ट्रमंडळ खेळातील सुर्वण पदक विजेते अखिल कुमार बंदोबस्तावर लक्ष ठेवतानाच मित्रांच्या मदतीने पैसे जमवून गरजवंताना खाण्यापिण्याचे सामान, सॅनीटायझर्स पुरवीत आहेत. अर्जुन अॅवॉर्डविजेते आणि पदमश्री सन्मान मिळालेले कब्बडीपटू अजय ठाकूर हिमाचल पोलीस मध्ये ड्युटी करत असून लोकांना मास्क, सॅनीटायझर्स, औषधे मिळताहेत का याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि लोकांनी घराबाहेर पडू नये याचीही काळजी घेत आहेत.

Leave a Comment