
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा धोका भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत वाढत नसला तरीही देशासमोर त्याचे एक मोठे संकट आहे. सर्वच स्तरातून त्यादृष्टीने महत्त्वाची पावले उचलण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. Monetary Policy Committee (MPC) ची याचसंदर्भात बैठक झाली. कोरोनामुळे ही बैठक 24 ते 27 मार्च या कालावधीत लवकर घेण्यात आली, या बैठकीतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे अनेक कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रिझर्व्ह बँकेकडून रॅपो रेटमध्ये मोठी कपात, कर्ज होणार स्वस्त
रॅपो रेट कमी करण्याचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्णय घेतला आहे. 75 bps ची कपात रॅपो रेटमध्ये करण्यात आली आहे आणि 4.40 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि इतर कर्जांचे हफ्ते भरताना मोठा दिलासा मिळणार असल्याची ही माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी दिली. आर्थिक स्थिरता आणण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
त्याचप्रमाणे होम लोन, कार लोन आणि इतर काही कर्जांवरील ईएमआय स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जावरील ईएमआय कमी होणार असून सर्व पीएसयू बँका व्याजदरांमध्ये कपात करणार आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे कर्ज रॅपो दराबरोबर थेट लिंक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आरबीआयने रिव्हर्स रॅपो रेटमध्ये 90 bps ची कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा दर आता 4 टक्क्यांवर पोहोचला आहे.
