प्रसिद्ध बॉलिवूड गायिका कनिका कपूरला देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्याचे स्पष्ट झाले असून धक्कादायक बाब म्हणजे गायिका कनिकाने लंडन दौऱ्यावरून परतल्यानंतर आपल्याला कोरोना झाल्याचे लपवले होते. त्यानंतर तिने एक पार्टीही दिली. बॉलिवूडचे जवळपास १०० सेलिब्रेटी या पार्टीमध्ये सहभागी झाल्याची माहिती असल्यामुळे बॉलिवूडमध्ये आता भीतीचे वातावरण परसले आहे.
आता आयसोलेशन वार्डमध्ये कनिकाला ठेवण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू झाले असले तरी त्या पार्टीमध्ये कोणकोण सहभागी झाले होते आणि त्यांची मेडिकल कंडिशन काय आहे, याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. सेलिब्रिटी व्यक्तीने का खबरदारी घेतली नाही? तसेच लंडनवरुन परतल्यानंतर तिची तपासणी झाली होती का, आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
गायिका कनिका कपूरला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत तिने इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. आपल्याला कोविड -१९ झाल्याचे तिनेच म्हटले आहे. कनिका आणि तिचे कुटुंब सध्या पूर्णपणे वेगळे ठेवण्यात आल्याची माहिती तिने पोस्टच्या माध्यमातून दिली.