
पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ‘पीएमपीएमएल’ बसच्या 584 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता दर 10 मिनिटांऐवजी 20 मिनिटांनी बस स्टॉपवर बस येणार आहे. गर्दीतून होणारा संसर्ग रोखण्यासाठी हा उपाय योजण्यात आला आहे.
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी PMPML बसच्या 584 फेऱ्या रद्द
दररोज 1800 पेक्षा जास्त फेऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएल बसच्या होतात. पण ‘कोरोना’चा प्रसार बस वाहतुकीच्या माध्यमातून होऊ नये, यासाठी ही संख्या एक हजारच्या आत आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार आज (बुधवार 18 मार्च) बसच्या 584 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पहिल्या 24 तासात प्रवासी संख्या 12 लाखांवरुन 9 लाखांवर आली आहे.
‘कोरोना’विषयी जनजागृती झाल्यामुळे अनेकांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडणे पसंत केले आहे. खाजगी वाहनाने प्रवास करण्यास पसंती देणारे पुणेकर घरी राहण्यात धन्यता मनात असल्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. त्यातच PMPMLच्या प्रवाश्यांची संख्या रोडावली आहे. पण कोरोनाग्रस्तांची ही आकडेवारी सार्वजनिक वाहतुकीतून वाढू नये, याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. गेल्या पाच दिवसांपासून पीएमपीएलचे रोजचे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु ‘कोरोना’सारखा जीवघेणा व्हायरस फोफावण्यापेक्षा होणारे नुकसान परवडणारे आहे.
